कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय; आता खासगी वाहनांसाठी….
Maharashtra Cabinet Meeting : महाराष्ट्र राज्य शासन, म्हणजेच फडणवीस सरकारने सत्तेत आल्यानंतर अनेक निर्णयांची मालिका सुरु केली असून, आता त्यात आणखी एका महत्त्वाच्या निर्णयाची भर पडली आहे. हा निर्णय सामान्य जनतेवर थेट परिणाम करणारा असल्याने अनेकांनी त्याचं स्वागत केलं आहे, तर काहींनी नाराजीही व्यक्त केली आहे.

नेमका काय निर्णय घेण्यात आला?
बाईक पूलिंगला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आता महाराष्ट्र शासनाने नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत नोंदणीकृत अॅप आणि वेब-आधारित प्लॅटफॉर्मद्वारे कार पूलिंगलाही कायदेशीर मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्यांवर लवकरच काहीसा तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
कार पूलिंग म्हणजे काय?
सध्याच्या काळात ‘कार पूलिंग’ हा शब्द अनेकदा ऐकायला मिळतो, पण त्याचा नेमका अर्थ काय आहे हे सगळ्यांना माहितच असेल असं नाही. कार पूलिंग म्हणजे काय? तर, एकाच दिशेला जाणाऱ्या एकाहून अधिक व्यक्तींनी एकाच कारमधून एकत्र प्रवास करणे. यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होते, इंधनाची बचत होते आणि पर्यावरणाचीही हानी कमी होते.
केंद्र सरकारच्या ग्रीगेटर नीति 2020 च्या आधारे निर्णय
हा निर्णय केंद्र सरकारच्या ‘ग्रीगेटर नीति 2020’च्या आधारे घेण्यात आला आहे. या धोरणानुसार बिगर व्यावसायिक वाहनांच्या पूलिंगला परवानगी मिळते. मात्र, या निर्णयाला अंतिम मंजुरी देण्याचा अधिकार केंद्र शासनाकडे आहे.
या निर्णयाचा ऑटो-टॅक्सी चालकांना फटका?
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये मात्र तीव्र नाराजी आहे. त्यांच्या मते, या निर्णयाचा त्यांच्या रोजच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे, ज्यामुळे त्यांच्या आव्हानांत आणखी वाढ होऊ शकते.
मनमानीला काही प्रमाणात बसणार आळा
मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक अशा जास्त मागणी असलेल्या मार्गांवर अनेक अॅप्स किंवा खासगी वाहन सेवांची मनमानी थांबवण्यासाठी या निर्णयामुळे काही प्रमाणात आळा बसेल. प्रवाशांची सुरक्षितता हा यामधील महत्त्वाचा मुद्दा असून, त्यासाठी राज्य शासन लवकरच सविस्तर नियम, अटी आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार आहे.
कार पूलिंग सेवेची प्रभावी पाहणी आणि व्यवस्थापन होण्यासाठी सुसूत्रता आणणं गरजेचं असेल. त्यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर या निर्णयाचे नेमके परिणाम काय होतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.