ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

पश्चिम रेल्वेवर 35 तासांचा ब्लॉक; 163 लोकल रद्द तर मेल-एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

मुंबईतील लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. पण आता याच प्रवाशांचा खोळंबा होणार आहे. कारण, पश्चिम रेल्वेने 35 तासांचा विशेष ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे लोकलच्या 163 फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. इतकेच नाही तर मेल-एक्सप्रेसच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत. या काळात कांदिवली ट्रॅफिक यार्ड लाईन, पाचवी लाईन आणि कारशेड लाईनवर ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकमुळे, काही उपनगरीय रेल्वे सेवा रद्द केल्या जातील आणि मेल – एक्सप्रेस गाड्या पर्यायी मार्गांवर चालवल्या जाणार आहेत.

35 तासांचा ब्लॉक

पश्चिम रेल्वेवरील कांदिवली आणि बोरिवली या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान करण्यात येणाऱ्या कामामुळे ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक 26 एप्रिल ते 28 एप्रिल 2025 या काळात राबविण्यात येणार आहे. यामुळे अनेक लोकल, मेल-एक्सप्रेसच्या सेवांवर परिणाम होणार आहे. कांदिवली आणि बोरिवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान असलेल्या पुलाच्या रिगर्डरिंगचे काम पूर्ण करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे.

163 लोकल फेऱ्या रद्द

शनिवारी (26 एप्रिल) दुपारी 1 वाजल्यापासून रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत अशा एकूण 35 तासांचा ब्लॉक पश्चिम रेल्वेने जाहीर केला आहे. या ब्लॉकच्या काळात शनिवारी (26 एप्रिल 2025) लोकलच्या 73 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर रविवारी (27 एप्रिल 2025) लोकलच्या 90 फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक पाहुनच घराबाहेर पडा.

मेल – एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

  • ट्रेन क्रमांक 19418 अहमदाबाद – बोरिवली एक्सप्रेस ही 25 आणि 26 एप्रिल रोजी वसई रोडपर्यंत चालवण्यात येणार आहे. 
  • ट्रेन क्रमांक 19417 बोरिवली – अहमदाबाद एक्सप्रेस ही 27 एप्रिल रोजी वसई रोड येथून सुटेल.
  • ट्रेन क्रमांक 19425 बोरिवली – नंदुरबार एक्सप्रेस ही 26 आणि 27 एप्रिल रोजी भाईंदर येथून सुटेल. 
  • ट्रेन क्रमांक 19426 नंदुरबार – बोरिवली एक्सप्रेस ही 26 एप्रिल रोजी वसई रोडपर्यंत चालवण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेने जाहीर केलेल्या या 35 तासांच्या ब्लॉकमुळे नागरिकांनी आपली संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं. त्यासाठी रेल्वेची वेबसाईट, अॅपवर अधिक माहिती पहावी.