पाळधी ता, धरणगाव- तालुक्यातील येथे गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने रविवारी शहरात जोरदार हजेरी लावत हाहाकार उडवून दिला. अवघ्या तीन तासांत संपूर्ण शहर जलमय केले. सर्व नाले ओसंडून वाहू लागले. इंदिरा नगर परिसरातील घरांमध्ये पाणी शिरून अनेकांचे संसार वाहून गेले.
बघा व्हिडिओ____
तर शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले: परिसरातील ८० टक्के पेरण्या झाल्या असून पाऊस लांबल्याने खरीप हंगामात दुबार पेरणीचे संकट आले होते. अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कपाशी, भुईमूग आदी पिकांना यामुळे जीवदान मिळाले आहे. तूर्तास पाळधी परीसरातील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने तसेच यावर्षी समाधानकारक पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटोपून पेरणीची लगबग सुरू केली होती. पाऊस वेळेवर येईल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या. पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. पावसाअभावी तालुक्यातील पिके सुकण्यास, करपण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उशिरा का होईना आलेल्या या पावसामुळे पिकांना अशंत: जीवदान मिळाले असून, सुकलेली मका, सोयाबीन पिके या पावसाने हिरवीगार व टवटवीत झाल्याचे चित्र आहे. जून महिन्यात मृग नक्षत्रात पडणाऱ्या पावसाच्या भरवशावर खरीप हंगामातील पिकांची पेरणी बळीराजाने मोठ्या उत्साहात केली होती. मान्सून पूर्व मुसळधार पडलेला पाऊस व हवामान खात्याने वर्तवलेल्या दमदार पावसाच्या अंदाजाने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र पावसाने ओढ दिल्याने या भागात दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. मका, सोयाबीनसारखी पिके उन्हाच्या झळा सोसून सुकली होती, तर काही पिके करपण्यास सुरुवात झाली होती. नुकत्याच झालेल्या पावसाने दुबार पेरणीचे संकट पुढचे काही दिवस टळले असल्याने शेतकरी या पावसामुळे सुखावल्याचे बघायला मिळत आहे.
वादळी वाऱ्यामुळे शहरातील विजेच्या तारा तुटून वीजपुरवठाअधिक काळ खंडीत झाला. विविध झाडाची फांदी तुटल्याने, खांबावरील सर्व तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता.
दुपारी ४ वाजता वादळासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. थोड्याच वेळात लेंडी नाला, ओसंडून वाहू लागला गांधी चौक बजार पट्ट्यातील भागातील रस्ते व नाले एक झाले होते.
पाळधी बुद्रुक येथील इंदिरानगर भागात नाल्याचं पाणी घरात शिरल्याने त्या ठिकाणी हाहाकार उडाला. पावसामुळे परिसरातील पाण्याचा लोंढा रहिवाशांच्या घरात शिरू लागला. दर सेकंदाला पाण्याची पातळी वाढत होती. या पाण्यात अनेकांच्या घरातील अन्न-धान्य, कपड्यांसह संसारपयोगी वस्तू वाहून गेल्यात. मुलांसाठी नुकतीच घेतलेली शालेय पुस्तके भिजली तर काही जणांचे दप्तर वाहून गेले. रहिवाशांनी संभाव्य धोका ओळखून तातडीने मुलांना बाहेर काढले तर काहींनी त्यांना पलंग व खाटांवर बसविले.