वसुलीच्या तगादा लावणाऱ्या खाजगी सावकारावर गुन्हा दाखल
ऑनलाईन टुडे महाराष्ट्र – दीड लाखाच्या कर्जापोटी 2 लाख 76 हजारांची परतफेड करूनही खासगी सावकाराकडून मारहाण व मुद्दलसाठी तगादा सुरू असल्याची तक्रार अमित मनोहर आठवले (वय 32, रा.घाटगे कॉलनी, कदमवाडी) यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली. कवाळे पिता-पुत्रांसह चौघांविरोधात खासगी सावकारीचा गुन्हा दाखल झाला.
सौरभ संजय कवाळे, संजय कवाळे, विपुल कवाळे, शक्ती कवाळे (सर्व रा. धरतीमाता हौसिंग सोसायटी) अशी त्यांची नावे आहेत.
अमित आठवले वायरिंग कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांना पैशांची गरज असल्याने सौरभ कवाळे याच्याकडून ऑगस्ट 2019 मध्ये 1 लाख 60 हजार रुपये 7 टक्के व्याजाने घेतले होते. वेळोवेळी व्याज व दंडासह 2 लाख 76 हजार 900 रुपयांची परतफेड त्यांनी केली. यानंतरही 1 लाख 60 हजार रुपये मुद्दल देण्याचा तगादा सुरू होता. यातून आठवले यांच्या घरासमोरून दुचाकी फिरवणे, त्यांच्या वाहनांची तोडफोड, शिवीगाळ व मारहाणीचा प्रकारही कवाळे बंधूंकडून झाला होता.