पाळधी (प्रतिनिधी) : राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज आपल्या स्वत:च्या शेतावर जाऊन ई-पीक पाहणी ऍपच्या माध्यमातून पेर्याची नोंद केली. सर्व शेतकर्यांनी आपापल्या शेतातील पेरणीबाबतची माहिती यात अपडेट करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील हे आज सकाळी पाळधी येथील निवासस्थानी आले. सकाळीच त्यांनी पाळधी शिवारात असणार्या आपल्या शेतात जाऊन ई-पीक पाहणी ऍपच्या माध्यमातून शेतातील पेर्याची नोंद त्यांनी केली.
राज्य शासनाच्या महसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकर्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या मोबाईल ऍप द्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदी, बांधावरच्या झाडांच्या नोंदी, व चालू पड / कायम पड क्षेत्राच्या नोंदी अक्षांस व रेखांशासह नोंदविण्याची सोय देण्यात आलेली आहे. या स्मार्टफोन ऍप्लीकेशनची सुधारित २.० आवृत्ती ही १ ऑगस्टपासून सादर करण्यात आली आहे. यात शेतकर्यांना एक मुख्य आणि तीन दुय्यम खरीप पिकाची नोंद करण्यची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.
या माध्यमातून अगदी अक्षांक्ष व रेखांशनुसार शेतीतील पिकांची नोंद करण्यात येते. या पीक पाहणीत एकदा नोंद केल्यानंतर त्यात बदल करायचा असल्यास ४८ तासांची मुदत देखील देण्यात आली आहे. या सर्व सुविधांचा शेतकर्यांनी लाभ घेण्याचे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.
दरम्यान, केंद्र व राज्य शासनाने शेतकर्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून यात पीएम किसान योजनेसाठी ३१ ऑगस्ट पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले आहे. यावेळी सोबत माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, नारायणआप्पा सोनवणे, सरपंच प्रकाश पाटील, अरुण पाटील, कोतवाल राहुल शिरोळे , किशोर शिरोळे , योगेश पाटील, विजय पाटील , अनिल माळी , आबा माळी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.