जळगाव- जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी निसच्छिती समितीच्या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ७९.९८ दलघमी मागणी आरक्षणास मान्यता दिली असून ल.पा.प्रकल्पाच्या मुख्यवितरीका व पाटचाऱ्यांची दुरुस्ती चे प्रस्ताव सादर करन्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी ज्या १० लघु प्रकल्पांमध्ये अल्पसाठा आहे त्या प्रकल्पांअंतर्गत गावांमध्ये पाणी टंचाई भासू नये यासाठी सूक्ष्म नियोजन करून भविष्यात पाणीटंचाई होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
जळगाव जिल्ह्यात हतनूर, गिरणा आणि वाघूर हे तीन मोठे प्रकल्प असून यावर १४० गावे अवलंबून आहेत.तर, बोरी, भोकरबारी, मन्याड, अंजनी, अग्नावती, बहुळा, तोंडापूर, हिवरा आणि गुळ या मध्यम प्रकल्पांवर १११ गावे अवलंबून आहेत. तर ४० लघु प्रकल्पांचा १११ गावांना लाभ होतो. अर्थात, तिन्ही प्रकारातील प्रकल्पांचा जिल्ह्यातील ३६२ गावांना लाभ होतो. या सर्व प्रकल्पांमधील ७९.९८ दश लक्ष घनमीटर पाणी आरक्षणाला या बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली.
११ गावांचा नव्याने समावेश
अंजनी मध्यम प्रकल्पाअंतर्गत पाणी आरक्षण कल्याणे खु. वाघाळूद, चावळखेडा, पिंपळेसिम, भोद बु, भोद खु. हनुमंतखेडे, कल्यानें होळ, हिंगोणे खु. सतखेडा या ११ गावांना नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी व ग्रामस्थांना पिण्याच्या पाणी वापरासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
या संदर्भात वृत्त असे की, जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समितीची बैठक पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज अजिंठा शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड, अधिक्षक अभियंता आणि प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधीकरण एस. डी. दळवी, गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. पी. अग्रवाल, मनपाचे शहर अभियंता एम. जी. गिरगावकर, महसूलचे नायब तहसीलदार अमित भोईटे, पाटबंधारे विभागाचे डी. बी. बेहेरे, मध्यम प्रकल्पाच्या अदिती कुलकर्णी, मजिप्रा अधिक्षक अभियंता एस. सी. निकम आणि पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता जी. एस.भोगवडे व महसूल सहायक मोनिष बेंडाळे व उप अभियंता शशिकांत चौधरी यांची उपस्थिती होती.
बैठकीचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार अमित भोईटे यांनी केले तर प्रास्ताविकात अधीक्षक अभियंता एस डी दळवी यांनी पाणी आरक्षणाबाबत सविस्तर माहिती विशद केली तर आभार अव्वल कारकून प्रशांत साळुंके यांनी मानले.