मुंबई- थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यानं सुरु केलेल्या भारतातील मुलींची पहिली शाळा अर्थात भिडे वाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
तसेच येत्या दोन महिन्यात या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या तायारीला लागा, अशा सूचनाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. विधानभवनात यासंदर्भात आज बैठक पार पडली.
भिडेवाडा परिसरातील व्यावसायिक उच्च न्यायालयातील याचिका मागे घेणार आहेत. त्यानुसार पुणे शहरातील भिडेवाडा या राष्ट्रीय स्मारकाचं पुढील दोन महिन्यात भूमिपूजन करण्याची तयारी करा असे निर्देशच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच यासाठी वॉर फुटिंगवर काम करूनआयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी स्मारकाचे काम मार्गी लावावे असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांची शिष्टाई यशस्वी झाली आहे.
भिडेवाड्यात पुन्हा मुलींची शाळा होणं हेच सर्वात मोठं स्मारक असेल – भुजबळ
या बैठकीत छगन भुजबळ यांनी राष्ट्रीय स्मारकाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे स्त्री शिक्षणाची गंगोत्री अन् भारतातील पहिल्या महिला शिक्षिका. फुले दाम्पत्यांनी पुण्यातील भिडे
वाड्यात मुलींसाठीची पहिली शाळा सुरु करून शिक्षणाची कवाडं उघडली. मात्र, काळ सरला आणि हीच प्रेरणादायी शाळा अक्षरशः भग्नावस्थेत गेली. जागेचं प्रकरण न्यायालयात गेलं आणि खटला वर्षानुवर्षे सुरु राहिला आता मात्र हा वाद आपल्याला मिटवला पाहिजे.
पुणे येथील भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी काल दिवसभर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्यासह समता परिषदेचे अनेक कार्यकर्ते भिडेवाड्याच्या समोर उपोषणाला बसलेले होते. ही ऐतिहासिक वास्तू पुणे महानगरपालिकेने विहित पद्धतीने ताब्यात घेवून त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी मनपाने २१ फेब्रुवारी २००६ रोजी ठराव क्र. ५५७ अन्वये ठराव मंजूर केलेला आहे.
भिडेवाडयात पुणे महानगरपालिकेच्यावतीनं “सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा” सुरु करण्याचा निर्णयही २७ नोव्हेंबर २०२१ रोजी शासनाने घेतलेला आहे. महानगरपालिकेनं ही ऐतिहासिक वास्तू ताब्यात घेऊन या ठिकाणी मुलींची शाळा सुरु करून राष्ट्रीय दर्जाचं स्मारक करण्याची गरज आहे.