नशिराबाद गावात शाळेची निर्माणाधीन संरक्षण भिंत पडून १३ वर्षीय बालकाचा दबून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (ता. ३१) सकाळी घडली.याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, घटनेनंतर बालकाच्या नातलगांनी शाळा व्यवस्थापन सदस्य, बांधकाम ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याची आग्रही मागणी केली.
अशी घडली घटना
नशिराबादमधील मोहित योगेश नारखेडे (वय १३ रा. वरची अळी) सातवीच्या वर्गात शिकत होता. शाळेला सुट्ट्या असल्याने शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मित्रांसोबत सनसवाडी रोडवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर तो खेळायला गेला. खेळता खेळता अचानक शाळेची संरक्षण भिंत त्याच्या अंगावर पडली.
त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जळगावातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दुपारी बारच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक तपास हवालदार प्रकाश पाटील आणि योगेश माळी करीत आहेत.
आईवडिलांचा आक्रोश
मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच आईवडिलांचा आक्रोश मन हेलावणारा होता. मृताच्या पश्चात मोठा भाऊ केतन, आई निर्मलाबाई आहे, तर वडील नशिराबाद येथील ओरिएंट कंपनीच्या सिमेंट फॅक्टरीत ट्रॅक्टरचालक म्हणून नोकरीला आहेत.
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित शाळा प्रशासन आणि ठेकेदारावर गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृत मोहितचे वडील योगेश अशोक नारखेडे व नालतगांनी घेतला.
पोलिस व प्रशासनाने त्यांची समजूत घातल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे नशिराबाद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.