” ऐसी कळवळ्याची जाती
करी लाभेविण प्रीती”
संतांच्या या उक्तीप्रमाणे जगणारे अनेक लोक आहेत. कृषी विभागातून निवृत्तीनंतर खरंतर पांडुरंग अण्णांना आरामाने आयुष्य घालविता आले असते.
मात्र, आपल्या ज्ञानाचा गावातील मुलांना त्यांचे करिअर घडविण्यासाठी लाभ कसा होईल, या हेतूने त्यांनी मंदिरातच वर्ग सुरू केले. विज्ञान, गणिताचे मुलांना ते धडे देऊ लागले आणि अण्णांच्या या ज्ञानमंदिरातून स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणारी मुले घडू लागली.
पांडुरंग हरी पाटील आडगाव (ता. एरंडोल) येथील मूळ रहिवासी. ‘अण्णा’ म्हणून ते या परिसरात प्रचलित आहेत. कृषी विभागात नोकरी केल्यानंतर २० वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. २००३ मध्ये पांडुरंग अण्णा निवृत्त होऊन कासोद्यात स्थायिक झाले.
अर्जुननगर परिसरातील महादेव मंदिरात त्यांनी निवृत्तीनंतर पूर्णवेळ ज्ञानार्जनाचे कार्य सुरू केले. आपल्या गाव-परिसरातील विद्यार्थ्यांना ते गणित, विज्ञानाचे धडे देऊ लागले अन् तेही अगदी नि:शुल्क.
ज्ञानमंदिरातून स्पर्धा परीक्षांची तयारी
पंचप्राणेश्वर मंदिरात अण्णांची ही खासगी परंतु नि:शुल्क शिकवणी अनेक वर्षांपासून चालतेय. नवोदय, शिष्यवृत्ती, एमटीएस, सैनिकी स्कूल, अशा विविध स्पर्धा परीक्षांची तयारी ते विद्यार्थ्यांकडून करू घेत आहेत.
एकही सुटी न घेता या मंदिरात नियमित वर्ग भरत असतात. मंदिराच्या इमारतीत तरुण वर्गासाठी एक वाचनालय अण्णांनी सुरू केले आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत अण्णांचा उत्साह एखाद्या तरुण शिक्षकाला लाजवेल, असा असतो. विद्यार्थीही तितक्याच तन्मयतेने शिकत असतात.
अन्य शहरांमधूनही विद्यार्थी
अण्णांच्या या ज्ञानमंदिरातून आजपर्यंत नवोदय विद्यालयासाठी २६० विद्यार्थ्यांची निवड झाली. आज अण्णांकडे जळगाव जिल्हा ग्रामीण व शहरी विभागातून छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सुरत, अशा विविध ठिकाणाहून ६० ते ७० विद्यार्थी शिकत आहेत, तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या ग्रामीण भागातील होतकरू व तरुणांसाठी संगणक, लॅपटॉप अशा सुविधा देण्याचा अण्णांचा मानस आहे.
पांडुरंग पाटलांचा आज वाढदिवस. तोही सहस्त्रचंद्रदर्शन म्हणजे, ८० वा अभीष्टचिंतन सोहळा. अशा या प्रतिभासंपन्न समाज शिक्षकाचा निःस्वार्थ भावनेने चाललेला हा ज्ञानयज्ञ सदोदित तेवत राहो, अशी मंगल कामना करूया.
“जे ज्ञान आपल्याकडे आहे, ते इतरांना आणि त्यातही गावखेड्यातील मुलांना दिले, तर त्याची फलप्राप्ती, समाधान वेगळे, म्हणून २० वर्षांपासून या मंदिरातच मुलांची शिकवणी घेतोय. आनंददायी काम आहे, ते असेच अविरत सुरू ठेवणार.” -पांडुरंग पाटील