Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत म्हणजे…, मनोज जरांगे संतापले, केली मोठी मागणी
- शेती

सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत म्हणजे…, मनोज जरांगे संतापले, केली मोठी मागणी

राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत मिळेल अशी घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे, यावर आता मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

यंदा पावसाभावी राज्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगाम हातचा गेल्यामुळे शेतकरी हातबल झाले आहेत. शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. दरम्यान सरकारकडून राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना मदत म्हणून दिवाळीपूर्वी बँक खात्यांमध्ये प्रत्येकी पाच हजार रुपये जमा केले जातील अशी घोषणा देखील सरकारकडून करण्यात आली आहे.  मात्र सरकारने मदत म्हणून शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या रकमेवरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. शेतकऱ्यांना कमीत कमी हेक्टरी एक लाखांची मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षांच्या वतीने होत आहे.

दरम्यान यावरून आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांचे अनुदान देण्याची गरज असताना सरकारकडून पाच हजार रुपये देणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मलमपट्टी करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यांनी आज नवरात्रीनिमित्त  सोमठाणा गडावरील रेणुका मातेचं दर्शन घेतलं, त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना सरकारवर निशाणा साधला.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? 

दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची मदत देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. आंदोलन आणि मोर्चांपासून शेतकऱ्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी सरकार हा डाव खेळत असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, त्यांना तुटपुंजी मदत नव्हे, तर हेक्टरी एक लाख रुपयांचे अनुदान मिळणे आवश्यक आहे. सरकारचे धोरण शेतकरी हिताचे नाही, सरकारच्या पाच हजार रुपयांसाठी आता शेतकऱ्यांना बँकेच्या दारात उभं राहावं लागणार आहे. ही शेतकऱ्यांची थट्टाच नाही तर आणखी काय आहे, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी देखील सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या या मदतीवरून टीकेची झोड उठवली आहे. हेक्टरी एक लाख रुपयांची मागणी होत आहे.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/