नागपूर : राज्याचं लक्ष लागलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (Nagpur Graduate Constituency Election Result) मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडीवर असलेल्या भाजपच्या सुधाकर कोहळेंना दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये मात्र पिछाडीवर जावं लागलं आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बंडखोर कराळे गुरूजींची दुसऱ्या क्रमाकांची मतं ही काँग्रेसला गेल्यामुळे अभिजीत वंजारी यांनी अखेरच्या क्षणी बाजी मारली आहे. भाजपसाठी विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

राज्यामध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीची ((Maharashtra Vidhan Parishad Result 2026) मतमोजणी पार पडली. त्यामध्ये पुणे पदवीधरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या हर्षदा देशमुख-जाधव, पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, अमरावती शिक्षकमध्ये शिवसेनेचे किरण सरनाईक तर मराठवाडा पदवीधरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतापसिहं पाटील यांनी विजय मिळवला. मात्र नागपूरच्या मतमोजणीमध्ये मात्र सातत्याने बदल होत होता. त्यामुळे या चुरशीच्या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.
सुरुवातीला आघाडीवर असलेला भाजप नंतर पिछाडीवर
पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये भाजपच्या सुधाकर कोहळेंना 61,215 मतं मिळाली. काँग्रेसच्या अभिजीत वंजारींना 57,052 मतं मिळाली. तर 24,249 मतं घेऊन पवारांच्या राष्ट्रवादीतील बंडखोर अपक्ष उमेदवार नितेश कराळे तिसऱ्या स्थानी राहिले.
पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोणत्याही उमेदवाराने विजयाचा कोटा पूर्ण न केल्यामुळे दुसऱ्या क्रमांकाची मतं मोजली गेली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नितेश कराळेंच्या मतांची दुसऱ्या क्रमांकाची मते मोजण्यात आली. त्यामध्ये काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी बाजी मारली. नितेश कराळे यांना मिळालेल्या मतांपैकी 70 टक्के मतं ही अभिजीत वंजारींच्या बाजूने गेल्याचं दिसून आलं. त्यामुळेच वंजारींचा विजय सुकर झाला.
तब्बल 35 व्या फेरीपर्यंत भाजपचे सुधाकर कोहळे हे 2,940 मतांनी आघाडीवर होते. मात्र 30 व्या फेरीमध्ये, दुसऱ्या क्रमांकाच्या मतांची मोजणी केली असता अभिजीत वंजारी यांनी मोठी आघाडी घेतली.
Marathwada Graduate Constituency Election Result : मराठवाडा पदवीधरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची बाजी
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी विजय मिळवला. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर गुलाल उधळून जल्लोष केला. डॉ. प्रतापसिंह पाटील यांनीही दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये मोठी आघाडी घेतली आणि विजय मिळवला.
डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयानंतर ‘परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम’ अशा आशयाचे बॅनर देखील झळकवण्यात आले. हा महाविकास आघाडीचा विजय आहे, ही निवडणूक मतदारांनी हातात घेतली होती. त्यामुळेच आपला विजय निश्चित झाल्याची प्रतिक्रिया डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी दिली.




