काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपला फोन टॅप केला जात असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. या मुद्द्यावरून शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “मोदी-शाहांच्या राज्यात दुसरं काय होणार?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केलं.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 137 व्या जयंतीनिमित्त मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) आणि खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी राहुल गांधी यांच्या फोन टॅपिंगच्या आरोपाबाबत प्रश्न विचारला. त्यावर दोन्ही नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, फोन टॅपिंगसारखे प्रकार करणाऱ्यांना अखेर राजकीय परिणामांना सामोरं जावं लागतं. नेतन्याहू असोत किंवा निक्सन, अशा प्रकारांशी संबंधित नेत्यांना राजकीय पराभवाचा सामना करावा लागला आहे. मोदींच्या राजकारणालाही आता उतरती कळा लागली असून त्यांची सत्ता गेल्याचा दावा करत राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
फोन टॅपिंग आरोप ही वस्तुस्थिती असल्याचा सपकाळांचा दावा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनीही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आरोपाचं समर्थन करत सरकारवर टीका केली. “फोन टॅपिंग हा केवळ आरोप नसून वस्तुस्थिती आहे,” असं ते म्हणाले. पेगासस स्पायवेअर काही व्यक्तींच्या मोबाईलमध्ये इंस्टॉल करण्यात आल्याचा दावा सपकाळ यांनी केला. भाजपमधील दिवंगत नेत्यांच्या मोबाईलमध्येही हे स्पायवेअर इंस्टॉल करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, त्यावेळी हा विषय दडपण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. एपस्टीन फाईलच्या मुद्द्यावरूनही भाजप सत्य लपवत असल्याची टीका सपकाळ यांनी केली.
महागाईवरूनही केंद्र सरकारवर टीकेची झोड
दरम्यान, देशातील वाढत्या महागाईवर भाष्य करताना हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मोबाईल रिचार्जपासून ते इंधन, गॅस आणि भाजीपाल्यापर्यंत सर्वच वस्तूंच्या किमती वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारकडे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना नसल्याचा आरोप करत आगामी काळात महागाईचा भडका आणखी वाढू शकतो, असा इशाराही सपकाळ यांनी दिला. इंधनावरील कर कमी करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत नसल्याची टीका त्यांनी केली. मागणी आणि पुरवठ्याच्या मुद्द्यावर सरकार योग्य प्रकारे काम करत नसल्याचंही ते म्हणाले.
राहुल गांधींनी फोन टॅपिंगबाबत नेमकं काय सांगितलं?
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोशल मीडियावर एका युझरच्या प्रश्नाला उत्तर देताना फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला होता. आपल्या फोनकडे बोट दाखवत त्यांनी फोनमध्येच यासंदर्भातील पुरावे असल्याचं म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्याबद्दलची माहिती कशी मिळते, हे आपल्याला माहीत असल्याचं सांगत आपला फोन टॅप केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच पंतप्रधानांनी समोरासमोर चर्चेसाठी तयार व्हावं, असं आव्हानही त्यांनी दिलं. परकीय शक्तींच्या नियंत्रणाखाली नेमकं कोण आहे, याबाबत सत्य समोर आणण्याचा दावा करत राहुल गांधी यांनी या प्रकरणावरून केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत.




