राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अलीकडेच झालेल्या पत्रकार परिषदेत सामान्य नागरिकांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांनी सुटे दूध, तूप आणि वनस्पती तेल यांची खरेदी न करण्याचे आवाहन केले.

शेतकऱ्यांकडून थेट कच्चे दूध घेत असल्यास ते ठीक आहे, मात्र दुकानातील सुटे दूध टाळावे, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. कच्च्या दुधात आणि सुट्या दुधात मोठा फरक असतो. पाश्चराईज्ड दूध हवे असल्यास ते फक्त सीलबंद पिशवीत किंवा पॅकेटमध्येच विकत घ्यावे. उत्पादनाची तारीख आणि एक्स्पायरी डेट जरूर तपासावी, असा सल्ला त्यांनी दिला.
विक्रेत्यांनाही कठोर इशारा देत मुंढे म्हणाले की, तूप, लोणी किंवा वनस्पती तेलात प्राण्यांच्या चरबीची भेसळ अजिबात चालणार नाही. “आधार नसलेले शुद्ध देसी तूप” किंवा “100 टक्के प्युअर” असे दावे करून विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. शुद्ध तूप किंवा 100 टक्के शुद्ध असा कोणताही प्रकार वास्तवतेत अस्तित्वात नसतो. असे दावे दिसल्यास नागरिकांनी विभागाला कळवावे, असे त्यांनी सांगितले.
बाजारातील दूध खरेदी करण्यापूर्वी त्याचे तापमान किती असायला हवे? तुकाराम मुंडेंनी नेमकं काय सांगितलं?
दूध खरेदी करताना तापमानाबाबतही मुंढे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. दुधाचे तापमान 4 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नसावे. गाई-म्हशीचे दूध काढल्यानंतर दोन तासांपेक्षा जास्त वेळ उघड्यावर साध्या तापमानात ठेवल्यास त्यात ॲसिडिटी निर्माण करणारे घटक तयार होतात. दुकानातील फ्रिजर किंवा टँकरमधील तापमान योग्य राखले जाते का, याची खात्री नसल्याने सुटे दूध धोकादायक ठरू शकते.
नागरिकांनी जागरूक राहून सुरक्षित दूध व तूप खरेदी करावे आणि भेसळ आढळल्यास तक्रार करावी, असा संदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.