राज्याच्या राजकारणात सध्या पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांनी वेग घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांदरम्यान आता शिवसेनेच्या एकत्रीकरणाचाही मुद्दा चर्चेत आला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी “दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर आपल्याला सर्वाधिक आनंद होईल”, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. शिवसेनेच्या एकत्रीकरणासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना एकत्रीकरणावर उदय सामंत काय म्हणाले?
गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय भेटीगाठी आणि संभाव्य पक्षीय समीकरणांबाबत चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना यामुळे अधिक जोर मिळाला आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकत्र यावे, अशी इच्छाही काही नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, कोणत्या पक्षासोबत जायचे किंवा एकत्रीकरणाचा निर्णय घ्यायचा की नाही, हे ठरवण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. शिंदे यांच्या नेतृत्वावर आपला पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले. हा धोरणात्मक निर्णय असल्याने यावर अंतिम भूमिका एकनाथ शिंदेच मांडतील, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
‘एकनाथ शिंदेंमुळे अनेक नेत्यांना संधी’
उदय सामंत यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचेही समर्थन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली आणि राज्याच्या राजकारणात आपल्याला ओळख मिळवून देण्यात शिंदे यांचा मोठा वाटा असल्याचे सामंत म्हणाले.
शिंदे यांच्या नेतृत्वामुळे अनेक नव्या नेत्यांना पुढे येण्याची संधी मिळाली आहे. सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधण्याची आणि त्यांच्या प्रश्नांमध्ये सहभागी होण्याची त्यांची कार्यपद्धती महत्त्वाची असल्याचेही सामंत यांनी अधोरेखित केले. जालना दौऱ्यात झोपडीत जाऊन सामान्य नागरिकांसोबत जेवण करण्याच्या प्रसंगाचाही त्यांनी उल्लेख केला.
रत्नागिरीतील डायलिसिस सेंटरबाबतही मोठी ग्वाही
राजकीय विषयांसोबतच उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबतही महत्त्वाची माहिती दिली. जिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेवा बंद होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या 1,113 रुग्णांना मोफत डायलिसिस उपचार दिले जात असून, एचएलएल कंपनीची पाच युनिट या ठिकाणी कार्यरत आहेत. ही सेवा अखंडित सुरू राहावी यासाठी संबंधित कंपनीला सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी डायलिसिस मशीन बाहेर नेण्यास प्रतिबंध करणारा निर्णय घेतल्याचेही सामंत यांनी सांगितले.
