दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या दुर्घटनेनंतर हवाई सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच आता सोलापूर विमानतळावरून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमानाचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानाच ते धावपट्टीवरून घसरून बाजूला गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेत विमानातील शिकाऊ महिला वैमानिक सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच विमानतळ प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिकाऊ महिला वैमानिक विमानाचे टेकऑफ करण्याच्या तयारीत होती. याचवेळी विमानाचा ताबा सुटल्याने ते धावपट्टीवरून खाली घसरले. विमानाने प्रत्यक्ष उड्डाण घेण्यापूर्वीच हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने विमानतळावर दाखल झाल्या. संभाव्य धोका टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, सोलापूर विमानतळ प्राधिकरणाकडून या अपघाताबाबत सविस्तर अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
अलीकडील विमान दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर हवाई सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. विशेषतः प्रशिक्षणार्थी वैमानिकांच्या उड्डाण प्रक्रियेदरम्यान सुरक्षेचे नियम, तांत्रिक तपासणी आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी ठोस कार्यपद्धती असण्याची गरज अधोरेखित होत आहे. शिकाऊ वैमानिकांच्या प्रशिक्षणादरम्यान सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
