जालना : शेतामध्ये सोन्याने भरलेले सात हंडे असल्याचा संशय आणि ते मिळवण्यासाठी करण्यात आलेली अघोरी पूजा. या प्रकारामुळे जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. परतूर तालुक्यातील टकले पोखरी गावाच्या शिवारात रात्रीच्या वेळी हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी शेतमालकासह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टकले पोखरी येथील शेतकरी शिवलाल धोंडीराम राठोड यांच्या शेतात सोन्याने भरलेले सात हंडे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या हंड्यांचा शोध घेण्यासाठी त्यांनी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील काही व्यक्तींना शेतात बोलावल्याची माहिती समोर आली आहे.
रात्रीच्या अंधारात पूजा, पोलिसांची अचानक धडक
11 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास शेतात पूजेची तयारी करण्यात आली होती. याचदरम्यान रात्री गस्तीवर असलेल्या परतूर पोलिसांना या प्रकाराची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि उपस्थितांची चौकशी केली. पोलिसांनी घटनास्थळाची झाडाझडती घेतली असता तेथे लिंबू, नारळ, सुपारी, बदाम, कुंकू यांसह पूजेसाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. पोलिसांनी हे साहित्य जप्त केले असून, त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई
या प्रकरणी शेतमालकासह एकूण नऊ जणांविरोधात महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेतील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास परतूर पोलीस करत आहेत.
दरम्यान, शेतात खरोखरच सोन्याचे सात हंडे असल्याचा केवळ संशय व्यक्त करण्यात आला होता. या दाव्याची कोणतीही पुष्टी झालेली नाही. मात्र, कथित सोन्याच्या हंड्यांच्या शोधासाठी करण्यात आलेल्या या पूजेच्या प्रकारामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.




