मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील पेंच अभयारण्य परिसरात झालेल्या भीषण कार अपघाताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत दिशांत अली या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर भाजप आमदार परिणय फुके यांच्या कुटुंबाचे नाव चर्चेत आले असून, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर या अपघातासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. अपघातग्रस्त वाहन आमदार परिणय फुके यांच्या मालकीचे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच अपघाताच्या वेळी आमदारांचा मुलगा यर्थाथ फुके हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला आहे.

या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप होता कामा नये, अशी भूमिका हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडली. एका तरुणाचा जीव गेल्यानंतर दोषींना वाचवण्यासाठी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्यास तो सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही या दुर्घटनेवर संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, अपघाताच्या वेळी कारमध्ये पाच तरुण आणि पाच तरुणी होते. सर्वांनी मद्यपान केले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील कुरई पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, या अपघाताने राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, आता सर्वांचे लक्ष पोलीस तपासाकडे लागले आहे. अपघाताच्या वेळी नेमकी परिस्थिती काय होती, वाहन कोण चालवत होते आणि मद्यप्राशनासंदर्भातील आरोपांमध्ये किती तथ्य आहे, हे तपासातून स्पष्ट होणार आहे. या दुर्घटनेत एका तरुणाचा जीव गेल्याने दोषींवर निष्पक्षपणे कारवाई होणार का आणि या प्रकरणात कोणालाही राजकीय अभय मिळणार नाही ना, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
