Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • NCP Merger: राष्ट्रवादीत पडद्यामागे नेमकं काय घडतंय? आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांची सात आमदारांसोबत महत्त्वाची बैठक सुरु
- Breaking News - महाराष्ट्र - राजकारण

NCP Merger: राष्ट्रवादीत पडद्यामागे नेमकं काय घडतंय? आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांची सात आमदारांसोबत महत्त्वाची बैठक सुरु

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच पक्षात पडद्यामागे नेमक्या कोणत्या हालचाली सुरू आहेत? आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून आमदारांना फोन आणि आता पार्थ पवारांची सात आमदारांसोबत महत्त्वाची बैठक! या बैठकांमागे नेमकं कारण काय? राष्ट्रवादीत काही मोठा निर्णय होणार का?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या गटातील नेत्यांमध्ये यासंदर्भात पडद्यामागे हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. विलिनीकरणाचा मसुदा, त्यातील अटी आणि भविष्यातील राजकीय भूमिका यावर दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या चर्चांना वेग आलेला असतानाच काही राजकीय वक्तव्यांमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.

संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील गटातील जवळपास 20 ते 22 आमदार पक्षातून बाहेर पडण्याच्या विचारात असल्याचा दावा राऊत यांनी केला होता. हे आमदार शरद पवार यांची भेट घेत आहेत, ते केवळ अनौपचारिक चर्चेसाठी नाहीत, असे सूचक विधानही त्यांनी केले होते.

राऊत यांच्या या दाव्यानंतर अजित पवार गटात हालचाली वाढल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाकडून राष्ट्रवादीच्या आमदारांशी संपर्क साधला जात असल्याची माहिती समोर आली. विलिनीकरणाबाबत संबंधित आमदारांची भूमिका काय आहे, शरद पवार गटातील नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे का, याची विचारणा केली जात असल्याचे वृत्त आहे.

विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मतभेद?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे बोलले जात असले, तरी या प्रक्रियेत सर्वांचे एकमत असल्याचे चित्र नाही. काही नेत्यांकडून स्वतंत्र राजकीय अस्तित्व कायम ठेवण्याची भूमिका मांडली जात असल्याची चर्चा आहे. तसेच, स्वतंत्र गट म्हणून एनडीएसोबत राहण्याच्या पर्यायावरही काही नेत्यांनी विचार मांडल्याचे वृत्त आहे.

दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनी विलिनीकरणाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळेही या चर्चांना वेगळे वळण मिळाले आहे. त्यामुळे दोन्ही गटांतील नेत्यांची नेमकी भूमिका काय आहे आणि भविष्यात कोणता राजकीय निर्णय घेतला जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

पार्थ पवारांची पुण्यात महत्त्वाची बैठक

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार सक्रिय झाल्याची माहिती समोर येत आहे. शुक्रवारी पुण्यातील जिजाई बंगल्यावर त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसह निवडक आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार उपस्थित राहिल्याची माहिती आहे. भोरचे आमदार शंकर मांडेकर हे देखील बैठकीसाठी जिजाई बंगल्यावर पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे, या बैठकीसाठी सर्व आमदारांना न बोलावता ठराविक आमदारांनाच निमंत्रित करण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पार्थ पवार यांनी अचानक बैठक बोलावण्यामागे नेमके कारण काय? विलिनीकरणाच्या चर्चांबाबत आमदारांची मते जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे का? की आगामी राजकीय रणनीती निश्चित करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, या बैठकीचा अधिकृत अजेंडा किंवा त्यामागील नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही.

राष्ट्रवादीचे प्रमुख नेते दिल्लीत; भेटीगाठींकडे लक्ष

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आलेला असतानाच दोन्ही गटांतील महत्त्वाचे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे संसदीय समित्यांच्या बैठकांसाठी दिल्लीत उपस्थित आहेत. सुनील तटकरे हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूविषयक संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. तर सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल हे वित्तविषयक समितीशी संबंधित आहेत. दिल्लीत सकाळी 11.30 वाजल्यापासून संसदीय समित्यांच्या बैठका होणार असल्याची माहिती आहे.

या बैठकांच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील प्रमुख नेत्यांची एकमेकांशी भेट होणार का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. संसदीय कामकाजासाठी झालेल्या या उपस्थितीचा विलिनीकरणाच्या चर्चांशी काही संबंध आहे का, याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत.

पुढील काही तास महत्त्वाचे ठरणार?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये आता अनेक महत्त्वाच्या घडामोडी समोर येत आहेत. एका बाजूला आमदारांशी संपर्क साधला जात असल्याचे वृत्त, दुसरीकडे पार्थ पवार यांनी बोलावलेली निवडक आमदारांची बैठक आणि त्याचवेळी दिल्लीत उपस्थित असलेले दोन्ही गटांचे प्रमुख नेते, यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट प्रत्यक्षात एकत्र येणार का, विलिनीकरणाच्या अटींवर एकमत होणार का आणि या प्रक्रियेत कोणत्या नेत्यांची भूमिका निर्णायक ठरणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या राजकारणात नेमके कोणते वळण येते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/