Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • सुनील तटकरे यांना व्हिलन का ठरवलं जातंय? आदिती तटकरे यांनी अखेर मौन सोडलं; विलिनीकरणावरही स्पष्ट भूमिका!
- नाशिक - महाराष्ट्र - राजकारण

सुनील तटकरे यांना व्हिलन का ठरवलं जातंय? आदिती तटकरे यांनी अखेर मौन सोडलं; विलिनीकरणावरही स्पष्ट भूमिका!

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेत सुनील तटकरे यांच्यावर होत असलेल्या टीकेवर आदिती तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजितदादा आणि सुनील तटकरे यांच्या जुन्या मैत्रीचा दाखला देत त्यांनी वडिलांची बाजू मांडली. विलिनीकरणाच्या निर्णयाबाबतही त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर शरद पवार गटातील नेत्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, आता या वादात सुनील तटकरे यांच्या कन्या आणि राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी उडी घेतली आहे. वडिलांना विनाकारण व्हिलन ठरवलं जात असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे.

‘अजितदादा आणि तटकरे यांची मैत्री अनेक वर्षांची’

आदिती तटकरे सध्या नंदुरबार दौऱ्यावर असून, यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सुनील तटकरे यांच्यावरील टीकेला उत्तर दिलं. त्या म्हणाल्या की, या संपूर्ण प्रकरणाकडे मी मुलगी म्हणून पाहते. सुनील तटकरे यांना व्हिलन ठरवलं जात आहे, ही दुर्दैवी बाब आहे. अजित पवार आणि सुनील तटकरे यांचे संबंध केवळ राजकीय नव्हते, तर त्यांची मैत्री अनेक वर्षांपासूनची होती. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वीपासून, अगदी काँग्रेसमध्ये एकत्र काम करत असल्यापासून दोघांमध्ये मैत्री होती. अनेक राजकीय आणि वैयक्तिक प्रसंगांना त्यांनी एकत्रितपणे तोंड दिलं. मात्र, त्यांच्या मैत्रीत कधीही दुरावा निर्माण झाला नाही, असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं.

अजितदादा आज आपल्यात नसले तरी मित्र म्हणून सुनील तटकरे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. प्रदेशाध्यक्ष म्हणूनही ते आपलं कर्तव्य बजावत आहेत. राजकारणात टीका होतच असते, असंही त्यांनी सांगितलं.

विलिनीकरणासाठी फोन आला का? आदिती तटकरे म्हणाल्या…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेला वेग आला असताना सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून आमदारांशी संपर्क साधला जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याबाबत आदिती तटकरे यांना विचारलं असता, आपल्याला अद्याप कोणताही फोन आलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. या विषयावर अनेक तर्कवितर्क आणि चर्चा सुरू आहेत. मात्र, आम्ही सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. सध्या राजकीय चर्चांपेक्षा माझ्या खात्याच्या कामकाजाला अधिक महत्त्व देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

‘अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील’

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत आदिती तटकरे यांनी कोणतीही ठाम भूमिका जाहीर केली नाही. आपण पक्षातील एक छोटी कार्यकर्ती असल्याचं सांगत त्यांनी निर्णयाची जबाबदारी वरिष्ठ नेत्यांवर सोपवली. शरद पवार, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे हे या संदर्भात योग्य तो निर्णय घेतील. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत आहोत. त्या जी भूमिका घेतील, ती आम्हाला मान्य असेल, असं आदिती तटकरे म्हणाल्या.

रामदास कदम यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर

दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवरही आदिती तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली. मित्रपक्षातील नेत्यांनी अशा प्रकारची टीका करणं निंदनीय आणि निषेधार्ह असल्याचं त्यांनी म्हटलं.

महायुती सरकारमध्ये तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे जनतेसाठी काम करणं आवश्यक आहे. प्रत्येक घटक पक्षाने आपली जबाबदारी ओळखून एकमेकांवर टीका करण्यापेक्षा समन्वय राखायला हवा. महायुती टिकवण्याची जबाबदारी केवळ एका पक्षाची नसून सर्वांची आहे. दोन्ही बाजूंनी जबाबदारी पार पाडली गेली, तर सरकारचं काम अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतं, असा सल्लाही त्यांनी दिला.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/