मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी तिच्या कोणत्याही चित्रपटामुळे किंवा अभिनयामुळे नव्हे, तर तिच्या एका खास वैयक्तिक प्रवासामुळे ती चर्चेचा विषय ठरली आहे. अमृताने नुकतीच कथक नृत्यप्रकाराची लेखी परीक्षा दिली असून, परीक्षेला बसतानाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कथकसाठी अमृताने घेतली विद्यार्थिनीची भूमिका
अमृता खानविलकरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती इतर विद्यार्थ्यांप्रमाणे वर्गात बसून परीक्षा देताना दिसत आहे. हातात हॉल तिकीट, रोल नंबर आणि समोर प्रश्नपत्रिका अशा परीक्षेच्या वातावरणात अमृता पूर्णपणे रमलेली पाहायला मिळते. तिच्यासाठी हा अनुभव केवळ परीक्षेपुरता मर्यादित नसून, स्वतःच्या आवडीसाठी सुरू केलेल्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. अमृताने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, काही वर्षांपूर्वी तिने स्वतःला कथक शिकण्याचे वचन दिले होते. कोणतीही घाई किंवा अपेक्षा न ठेवता, केवळ स्वतःच्या आनंदासाठी हा प्रवास सुरू ठेवण्याचा तिचा निर्णय होता.
प्राजक्ता माळीच्या कमेंटची सोशल मीडियावर चर्चा
अमृताच्या या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. मात्र अभिनेत्री प्राजक्ता माळीने केलेल्या कमेंटने विशेष लक्ष वेधून घेतले. प्राजक्ताने अमृताला, ‘Ohh MY MY… Welcome to the league, कसा गेला पेपर?’ असा मजेशीर प्रश्न विचारला. त्यावर अमृतानेही लगेच उत्तर देत ‘मस्त गेला पेपर’ अशी प्रतिक्रिया दिली. या दोघींमधील हा छोटासा संवाद चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
अमृताच्या जिद्दीचे चाहत्यांकडून कौतुक
अभिनय आणि नृत्याच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकणारी अमृता आता कथकच्या अभ्यासातही मनापासून मेहनत घेत आहे. व्यस्त कामातून वेळ काढत स्वतःच्या आवडीला प्राधान्य देण्याची तिची ही कृती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यामुळेच तिच्या या पोस्टला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत असून, चाहत्यांकडून तिचे अभिनंदन केले जात आहे.
