महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पावणेदोन तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या भेटीमागील राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.
वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार या सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाल्या. सुरुवातीला ऊर्जा विभागाशी संबंधित महाजेनकोच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत विभागाच्या कामकाजाबाबत काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.
मात्र, प्रशासकीय चर्चेनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा विषयही बैठकीत उपस्थित झाल्याची चर्चा आहे. या संभाव्य घडामोडींचा महायुतीच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
22 ते 26 आमदारांच्या भूमिकेमुळे राजकीय गणित बदलणार?
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये पडद्यामागे हालचाली सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. सुनेत्रा पवार यांच्या गटातील काही नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे दावे केले जात आहेत. विशेष म्हणजे, जवळपास २२ ते २६ आमदार या गटाच्या संपर्कात असल्याची माहिती चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर आमदारांची नेमकी भूमिका काय आहे आणि विलीनीकरणाच्या प्रस्तावाबाबत त्यांचे मत काय आहे, याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाणून घेतल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रक्रियेला आपला विरोध नसल्याची भूमिका काही नेत्यांनी मांडल्याचीही चर्चा आहे.
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सुनेत्रा पवार यांच्या गटातील नेत्यांकडून वेगवेगळी विधाने केली जात आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यापूर्वी अजित पवार विलीनीकरणासाठी सकारात्मक होते, असा दावा केला होता. तसेच या प्रक्रियेसाठी संभाव्य तारीखही त्यांनी सांगितल्याने चर्चांना आणखी हवा मिळाली. दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांनी विलीनीकरणाबाबत सावध भूमिका घेतली आहे. योग्य वेळ आल्यानंतर याबाबत माहिती दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
सुप्रिया सुळे यांची भूमिका वेगळीच!
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. विलीनीकरणाची चर्चा एकतर्फी सुरू असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच अजित पवार यांच्या निधनानंतर आपल्या दृष्टीने विलीनीकरणाचा विषय संपल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
त्यामुळे एका बाजूला विलीनीकरणाच्या चर्चांना वेग येत असताना दुसरीकडे दोन्ही गटांकडून वेगवेगळ्या भूमिका समोर येत आहेत. अशातच सुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची झालेली भेट महत्त्वाची मानली जात आहे. आता राष्ट्रवादीच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत नेमका कोणता निर्णय होतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
