Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण; चांदीचे भावही कोसळले, पाहा आजचे दर
- बिझनेस - महाराष्ट्र

Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण; चांदीचे भावही कोसळले, पाहा आजचे दर

जळगावच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि डॉलरमधील मजबुतीचा सोन्या-चांदीच्या दरांवर परिणाम झाला आहे.

सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जळगावच्या सराफा बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत सोन्याच्या दरात प्रति तोळा 3 हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात किलोमागे तब्बल 8 हजार रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर काल 1 लाख 37 हजार 500 रुपये प्रति तोळा होता. मात्र, आज हा दर घसरून 1 लाख 34 हजार 500 रुपयांवर आला आहे. म्हणजेच एका दिवसात सोन्याच्या किमतीत 3 हजार रुपयांची घसरण झाली आहे. चांदीच्या दारातही मोठी पडझड पाहायला मिळत आहे. काल एक किलो चांदीचा भाव 1 लाख 80 हजार रुपये होता. त्यात 8 हजार रुपयांची घट झाल्याने आज चांदीचा दर 1 लाख 72 हजार रुपयांवर पोहोचला आहे.

IBJA च्या दरांमध्येही मोठी घसरण

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन अर्थात IBJA ने जाहीर केलेल्या दरांनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 35 हजार 809 रुपयांवरून घसरून 1 लाख 34 हजार 380 रुपये प्रति तोळा झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 24 हजार 401 रुपयांवरून कमी होऊन 1 लाख 23 हजार 92 रुपयांवर आला आहे. चांदीच्या किमतीतही मोठी घट झाली असून, एक किलोचा दर 1 लाख 78 हजार रुपयांवरून 1 लाख 69 हजार 280 रुपयांपर्यंत खाली आला आहे. म्हणजेच IBJA च्या दरानुसार चांदी किलोमागे 8 हजार 720 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

MCX वरही सोने-चांदी घसरले

देशांतर्गत वायदे बाजारात म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या दरांवर दबाव दिसून आला. सोमवारी सकाळी चांदीच्या किमतीत 5 हजार 703 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे एक किलो चांदीचा भाव 1 लाख 70 हजार 600 रुपयांवर आला. दुसरीकडे, सोन्याच्या दरातही जवळपास 956 रुपयांची घट नोंदवण्यात आली. MCX वर सोन्याचा भाव 1 लाख 35 हजार 749 रुपयांवर व्यवहार करत होता.

जागतिक घडामोडींचा मौल्यवान धातूंच्या दरांवर परिणाम

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम भारतीय सराफा बाजारावर होत असल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवण्याची शक्यता, डॉलरमधील मजबुती आणि जागतिक बाजारातील दबाव यामुळे सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय चांदीची मागणी कमी झाल्याचाही तिच्या दरांवर परिणाम होत आहे.

विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यातही सोन्याच्या दरात मोठी घट झाली होती. 24 कॅरेट सोनं प्रति तोळा 5 हजार 950 रुपयांनी, तर 22 कॅरेट सोनं 5 हजार 450 रुपयांनी स्वस्त झालं होतं. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत सुमारे 4.5 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली होती. एकूणच, सोन्या-चांदीच्या दरातील घसरणीमुळे खरेदीदारांना दिलासा मिळत असला, तरी जागतिक बाजारातील परिस्थिती आणि डॉलरमधील चढ-उतार लक्षात घेता आगामी काळात या किमतींमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता आहे.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/