राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनी डिलिमिटेशन विधेयकाबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पक्ष या विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या खऱ्या असतील, तर या निर्णयाचा आपण तीव्र निषेध करू, अशी भूमिका नताशा यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून मांडली होती. त्यांच्या या विधानावर आता जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘मुलीच्या स्वातंत्र्यावर कधीही बंधन घातले नाही’
नताशा यांच्या विधानाबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, नताशा ही त्यांची एकुलती एक मुलगी असून आजपर्यंत तिच्या विचारस्वातंत्र्यावर कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने बंधने घातलेली नाहीत. तिने काय बोलावे आणि काय बोलू नये, हे सांगण्याचा प्रश्नच येत नाही. तिला आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, आव्हाड यांनी यावेळी पवार कुटुंबाबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. आमच्या कुटुंबावर आणि माझ्यावर शरद पवार साहेबांचे मोठे उपकार आहेत. त्याची परतफेड या जन्मातही होऊ शकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ही गोष्ट आपल्याला समजते, मात्र नताशाला कदाचित त्याची जाणीव नसेल, असेही ते म्हणाले.
शरद पवार लोकशाहीवादी नेते, मुलीला बोलण्याचे स्वातंत्र्य देतील
शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल बोलताना आव्हाड म्हणाले की, पवारसाहेब हे लोकशाहीवादी विचारांचे नेते आहेत. नताशाने आपले मत मांडू नये, असे ते कधीही सांगणार नाहीत. उलट तिला तिचे विचार मांडू द्या, तिच्या स्वातंत्र्यावर बंधने आणू नका, अशीच त्यांची भूमिका असेल. नताशा ही वाचनसंस्कृतीशी जोडलेली आहे. तिने एखाद्या विषयावर आपले मत व्यक्त केले असेल, तर केवळ त्यावरून तिचे म्हणणे नाकारता येणार नाही, असेही आव्हाड यांनी सांगितले.
विलीनीकरणाच्या चर्चेत सहभागी नव्हतो; आव्हाडांचे स्पष्टीकरण
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेबाबत विचारले असता जितेंद्र आव्हाड यांनी आपण या प्रक्रियेचा कधीही भाग नव्हतो, असे स्पष्ट केले. अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेतही आपण सहभागी नव्हतो आणि त्यानंतरच्या चर्चांमध्येही आपल्याला स्थान नव्हते, असे त्यांनी सांगितले. शरद पवार हेच आपल्यासाठी सर्वस्व असल्याचे सांगत, सुप्रिया सुळे यांनी या विषयावर भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे यापुढे या संदर्भात त्यांनाच प्रश्न विचारावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
डिलिमिटेशनवर अधिक बोलणे आव्हाडांनी टाळले
डिलिमिटेशन विधेयक आणि त्यासंबंधित राजकीय निर्णयांवर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी सावध भूमिका घेतली. आपण खासदार नसून केवळ आमदार आहोत. लोकसभेशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार पक्षातील वरिष्ठ नेते आणि खासदारांचा आहे. सुप्रिया सुळे, शरद पवार आणि पक्षाचे खासदार एकत्रितपणे याबाबत योग्य निर्णय घेतील, असे सांगत त्यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले.
