दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी (16 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही महत्त्वाच्या व्यक्तींवर गंभीर आरोप केले. त्यांच्या या आरोपांना आता भाजप आमदार परिणय फुके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अपघाताला साडेनऊ महिने उलटूनही अद्याप एफआयआर का दाखल झाला नाही? तपासाची प्रगती काय आहे? तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे का सोपवला जात नाही, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
यावेळी त्यांनी व्हीएसआर (VSR) कंपनीचे मालक व्ही. के. सिंह यांना कोणाकडून संरक्षण दिले जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्ही. के. सिंह यांच्या कुटुंबाशी जवळचे संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, फडणवीस यांचा अपघातात थेट सहभाग असल्याचा आरोप आपण करत नसल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
परिणय फुके यांचा रोहित पवारांना थेट सवाल
दरम्यान, रोहित पवारांच्या आरोपांवर भाजप आमदार परिणय फुके यांनी जोरदार पलटवार केला आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी, “रोहित पवार हा अजितदादा पवार यांच्या मरण्याची वाट बघत होता का?” असा थेट सवाल उपस्थित केला.
तसेच, अजितदादांच्या मृत्यूचे सत्य शोधण्यापेक्षा त्यांच्या निधनाच्या दुःखद घटनेचा वापर स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी केला जात आहे का, असा सवाल त्यांनी केला. अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारानंतर लगेचच ‘जुना वारसा घेऊन नवा पुतण्या येतोय’ आणि ‘काळ चेहरे बदलतो’ अशा मजकुराच्या रिल्स व्हायरल झाल्याचा उल्लेख करत या रिल्समागे नेमके कोण होते, असा प्रश्नही फुके यांनी उपस्थित केला. रोहित पवारांच्या वारंवार होणाऱ्या पत्रकार परिषदांवर टीका करताना त्यांनी अजितदादांच्या मृत्यूचे राजकीय भांडवल करू नये, असे म्हटले आहे.




