Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • Dhule News: धुळ्यात दिव्यांग शिक्षकाचे बंद घर फोडले; 80 हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास
- क्राईम - महाराष्ट्र

Dhule News: धुळ्यात दिव्यांग शिक्षकाचे बंद घर फोडले; 80 हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास

धुळे शहरातील मिल्लत नगर येथे चोरट्यांनी दिव्यांग शिक्षकाचे बंद घर फोडून 70 ते 80 हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेचा तपास चाळीसगाव रोड पोलीस करत आहेत.

धुळे: धुळे शहरात घरफोडीची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. वडजाई रोड परिसरातील मिल्लत नगर येथे चोरट्यांनी एका दिव्यांग शिक्षकाचे बंद घर फोडून 70 ते 80 हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

काझी नवीद असे चोरी झालेल्या घराच्या मालकाचे नाव आहे. ते शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. 10 ते 16 नोव्हेंबरदरम्यान ते कुटुंबीयांसह शिरपूर येथे आई-वडिलांना भेटण्यासाठी गेले होते. याच काळात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष्य केले. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि घरातील मौल्यवान वस्तूंची चोरी केली.

या घरफोडीत चोरट्यांनी 70 ते 80 हजार रुपयांची रोकड तसेच सात ते आठ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. 16 नोव्हेंबर रोजी रात्री नवीद कुटुंबीय घरी परतले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले आणि चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कष्टाने कमावलेली रोकड आणि दागिने चोरीला गेल्याने कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला.

घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुजित पाटील यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट दिली. यावेळी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करून चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, दिव्यांग शिक्षकाच्या घरात झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे मिल्लत नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणातील आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/