नागपूर: दुकानाची जबाबदारी आणि चाव्या विश्वासाने सोपवलेल्या मॅनेजरनेच मालकाचा विश्वासघात केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. तब्बल 15 वर्षांपासून विश्वासू कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या मॅनेजरने दुकानातील 91 लाख 3 हजार 790 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लकडगंज परिसरात राहणारे सुरेंद्र फतेहचंद कोठारी यांचे इंदोरा चौकाजवळ ‘गुरुदेव ज्वेलर्स’ नावाचे दागिन्यांचे दुकान आहे. या दुकानात ओजस-2 अपार्टमेंट परिसरातील रहिवासी तरुण मोहनलाल नाहटा हा मॅनेजर म्हणून काम करत होता. गेल्या सुमारे 15 वर्षांपासून तो दुकानात कार्यरत असल्याने मालकाचा त्याच्यावर विश्वास होता.
मात्र, याच विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने 31 मार्च 2026 ते 11 नोव्हेंबर 2026 या कालावधीत मालकाच्या परवानगीशिवाय आणि माहितीशिवाय दुकानातील सोन्याचे विविध दागिने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरून नेल्याचा आरोप आहे. या चोरीत एकूण 706 ग्रॅम 820 मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने गायब झाल्याचे समोर आले आहे. या दागिन्यांची बाजारभावानुसार किंमत तब्बल 91 लाख 3 हजार 790 रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. तक्रारीच्या आधारे पाचपावली पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.




