Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • Shaina NC Statement: बाळासाहेबांचा फोटो असलेले पान फाडल्याचा वाद; शायना एन. सी. यांनी मागितली जाहीर माफी, म्हणाल्या…
- महाराष्ट्र - मुंबई - राजकारण

Shaina NC Statement: बाळासाहेबांचा फोटो असलेले पान फाडल्याचा वाद; शायना एन. सी. यांनी मागितली जाहीर माफी, म्हणाल्या…

शायना एन. सी. यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेले पान फाडल्याच्या वादावर अखेर स्पष्टीकरण देत जाहीर माफी मागितली. बाळासाहेबांशी असलेल्या कौटुंबिक आठवणी सांगत त्यांनी आपल्या कृतीमागील भूमिका स्पष्ट केली आणि विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील मजकुरावरून सुरू झालेला राजकीय वाद आता नव्या वळणावर पोहोचला आहे. पत्रकार परिषदेत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेले पान फाडल्यामुळे टीकेच्या केंद्रस्थानी आलेल्या शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या शायना एन. सी. यांनी अखेर मौन सोडले आहे. त्यांनी आज सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले असून, बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून दिलगिरी व्यक्त केली आहे.

नेमके प्रकरण काय?

बुधवारी (18 नोव्हेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचा आरोप करत पुस्तकाची पाने फाडली होती. यादरम्यान, शायना एन. सी. यांच्या हातून फाडल्या गेलेल्या पानावर बाळासाहेब ठाकरे मणिशंकर अय्यर यांना जोडे मारत असल्याचा फोटो होता. या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नाना पटोले आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका करत बाळासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप केला होता.

काँग्रेस आणि ठाकरे गटाने या घटनेवर आक्षेप घेत शिंदे गटावर बाळासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप केला. या टीकेनंतर शायना एन. सी. यांनी आपली बाजू मांडली. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी बाळासाहेबांशी असलेल्या कौटुंबिक संबंधांचा उल्लेख केला. बाळासाहेब हे वडिलांचे जवळचे मित्र होते आणि लहानपणापासून त्यांचा सहवास लाभल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे, तर आपल्या लग्नालाही बाळासाहेब आवर्जून उपस्थित होते, अशी आठवण त्यांनी भावुकपणे सांगितली.

बाळासाहेब हे आपल्यासाठी पितृतुल्य आणि देवतुल्य व्यक्तिमत्त्व असल्याचे स्पष्ट करत, त्यांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असेही त्यांनी म्हटले. आपल्या कृतीचा जाणीवपूर्वक विपर्यास केला जात असल्याचा आरोप करत विरोधकांनाही प्रत्युत्तर दिले. बाळासाहेबांवरील प्रेम आणि निष्ठा सिद्ध करण्यासाठी कोणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे सांगत त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/