
कुंथलगिरी घाटात २७ वर्षीय गोविंद कागडे यांची निर्घृण हत्या; धारदार शस्त्राने गळ्यावर वार, डोक्यात दगड घालून संपवले जीवन
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील कुंथलगिरी डोंगर परिसरात २७ वर्षीय गोविंद कागडे यांच्या निर्घृण हत्येची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, लग्नाला अवघे आठ महिने झाल्यानंतर पत्नीने पतीला सोडले होते.

पत्नीचे प्रेमसंबंध आणि त्यामध्ये पती अडसर ठरत असल्याच्या कारणातून ही हत्या झाल्याचा संशय असून, या प्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद कागडे या २७ वर्षीय तरुणाची कुंथलगिरी डोंगर परिसरातील घाटात निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार केले, तसेच डोक्यावर दगड टाकून त्यांची हत्या केली. या घटनेचा तपास करताना पत्नीचे प्रेमसंबंध आणि त्यातून निर्माण झालेला कौटुंबिक वाद समोर आल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी गोविंद कागडे यांच्या पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या हत्येमागील नेमके कारण, कटाचे स्वरूप आणि गुन्ह्यातील इतर बाबींचा पोलीस तपास करीत आहेत.




