कारंजा–मानोरा मार्गावरील अडाण नदीच्या पात्रावर अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल सध्या जीर्ण अवस्थेत असल्याने या पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पुलावरील रस्त्याची काही कालावधीपूर्वी डागडुजी करण्यात आली असली, तरी पुलाच्या मूळ बांधकामाच्या दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून येत आहे.कारंजा–मानोरा मार्ग हा परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असून या पुलावरून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची ये-जा सुरू असते.

मात्र, पुलाची सद्यस्थिती पाहता त्याच्या मजबुतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. वाहनांची ये-जा सुरू असताना पुलावर कंपन जाणवत असल्याचे या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे.विशेष म्हणजे, पुलावरील रस्त्याची डागडुजी करून केवळ वरवरची दुरुस्ती करण्यापेक्षा पुलाच्या संपूर्ण बांधकामाची तांत्रिक तपासणी होणे आवश्यक आहे. पुलाचे वय, बांधकामाची सद्यस्थिती, भार सहन करण्याची क्षमता आणि संरचनात्मक मजबुती यांचे संबंधित तज्ज्ञ विभागामार्फत परीक्षण करणे गरजेचे आहे.

एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य धोका वेळीच ओळखून प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व मजबुतीकरणाची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून जोर धरत आहे. प्रशासनाने संभाव्य धोका गांभीर्याने घेऊन मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच अडाण नदीवरील या पुलाच्या सुरक्षिततेबाबत ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




