अकोला आरोग्य उपसंचालक आणि बुलढाणा पीसीपीएनडीटी पथकाची संयुक्त कारवाई; पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त — Sonography centre

बुलढाणा : शेतातील पत्र्याच्या गोठ्याला सोनोग्राफी केंद्र बनवून अवैधरित्या गर्भलिंग निदानाचा काळा धंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अकोला आरोग्य उपसंचालक कार्यालय आणि बुलढाणा, अकोला व वाशिम येथील पीसीपीएनडीटी पथकाने संयुक्त कारवाई करत बोगस डॉक्टरसह तिघांना रंगेहात पकडले. या कारवाईत पोर्टेबल सोनोग्राफी मशीनही जप्त करण्यात आले आहे.

अमडापूर-लव्हाळा मार्गावरील एका शेतात हा अवैध प्रकार सुरू असल्याची माहिती पीसीपीएनडीटी पथकाला मिळाली होती. संबंधित बोगस डॉक्टर पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गर्भलिंग निदान करत असल्याची माहिती समोर आली होती. या माहितीच्या आधारे उपसंचालक डॉ. आरती कुलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली डिकॉय (बनावट ग्राहक) प्रकरण तयार करून सापळा रचण्यात आला. सकाळी ६ वाजल्यापासून सुरू असलेला पाठलाग आणि पाळत अखेर यशस्वी ठरली.

शेतातील पत्र्याच्या गोठ्यात सुरू असलेल्या अवैध सोनोग्राफीच्या ठिकाणी पथकाने छापा टाकून बोगस डॉक्टर आणि त्याच्या साथीदारांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे ग्रामीण भागात लपूनछपून सुरू असलेल्या गर्भलिंग निदानाच्या अवैध व्यवसायाचा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.




