आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
अकोला जिल्ह्यातील पातूर येथील रहिवासी आणि सैन्य दलातील हवालदार किशोर साहेबराव गवई (वय 42) यांचे मध्यप्रदेशातील सागर येथील लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने पातूर शहरासह तालुक्यात शोककळा पसरली आहे.महार रेजिमेंटच्या दहाव्या बटालियनमध्ये कार्यरत असलेल्या गवई यांनी सलग १६ वर्षे देशाची सेवा केली.

एक उत्कृष्ट बॉक्सर म्हणून त्यांनी महाराष्ट्रात पातूरचे नाव उंचावले होते. आज, पातुरच्या मिलिंदनगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे. आनंद स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, तसेच पोलीस प्रशासनातर्फे त्यांना मानवंदना देण्यात येईल. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे.




