झेरॉक्स आणण्यासाठी खोलीतून बाहेर पडलेला समाधान म्हस्के रात्रभर बेपत्ता; अपघात की घातपात, पोलिसांकडून तपास सुरू*बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री उघडकीस आली. समाधान सुनील म्हस्के रा. पांढरदेव, ता. चिखली असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील धरणगावजवळील शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. समाधान हा मलकापूर येथील व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये द्वितीय सत्रात शिक्षण घेत होता. तो गजानन नगरी परिसरात मित्रांसोबत भाड्याच्या खोलीत राहत होता.

२२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास वर्गमित्राची दुचाकी घेऊन झेरॉक्स आणण्यासाठी जात असल्याचे सांगून तो खोलीतून बाहेर पडला. मात्र, रात्री दहा वाजेपर्यंत तो परत न आल्याने मित्रांनी त्याच्या आई-वडिलांना याबाबत कळविले. त्यानंतर मित्रांनी रात्रभर त्याचा शोध घेतला; मात्र त्याचा कुठेही पत्ता लागला नाही.दुसऱ्या दिवशी समाधानचे वडील सुनील म्हस्के आणि मामा मलकापूर येथे दाखल झाले. त्यांनी महाविद्यालय परिसरासह संभाव्य ठिकाणी शोध घेतला. यावेळी समाधान सायंकाळी महाविद्यालयासमोरून धरणगावच्या दिशेने जाताना दिसल्याची माहिती मिळाली. पुढे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील धरणगाव ढाब्याजवळ त्याने नेलेली दुचाकी उभी असल्याचे आढळून आले. परिसरातील शेतात शोध घेतला असता समाधानचा मृतदेह आढळून आला.घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सतीश बेले यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, समाधानचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हा अपघात आहे की यामागे घातपाताची शक्यता आहे? याचा तपास मलकापूर पोलीस करीत आहेत. एका होतकरूविद्यार्थ्याचा अशा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.


