वाशिम प्रतिनिधी धनंजय राठोड… वातावरणात झालेल्या बदलामुळे मागील आठ ते दहा दिवसांपासून परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. वाढत्या थंडीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, मागील १५ ते २० दिवसांमध्ये कारंजा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

थंडीच्या दिवसांत सर्दी, खोकला, ताप यांसह विविध आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मागील १५ ते २० दिवसांत जवळपास ७ हजार नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी व उपचारासाठी भेट दिल्याची माहिती आहे.दरम्यान, वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

थंडीच्या वेळेत अनावश्यकपणे बाहेर पडणे टाळावे, उबदार कपड्यांचा वापर करावा तसेच पहाटे आणि रात्रीच्या वेळी बाहेर प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारपण असलेल्या व्यक्तींनी थंडीपासून संरक्षणासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



