वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यामध्ये असणाऱ्या वाल्हई येथील ३५ वर्षीय शेतकरी पुत्राने विषारी औषध प्राशन केल्याची दुर्दैवी घटना घडली.गंभीर अवस्थेत त्याच्यावर अकोला येथे उपचार सुरू होते.

मात्र,उपचारादरम्यान रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री त्याचा मृत्यू झाला. गोलू सुखदेव शिंदे असे मृताचे नाव असून,या घटनेने वाल्हई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील नागरिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,गोलू शिंदे यांच्या कुटुंबाकडे सुमारे १२ एकर शेती असून शेतीवर कर्ज असल्याची माहिती आहे.शिंदे हे कष्टकरी शेतकरी कुटुंबातील असून शेतीच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते मेहनत घेत होते.
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच पावसाने लांबवलेली दडी आणि अत्यल्प पावसामुळे शेतीचे नियोजन विस्कळीत झाले. पिकांची अपेक्षित वाढ न झाल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यातच बियाणे,खते,मशागत आणि इतर शेती खर्चाचा वाढता आर्थिक भार शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढवत आहे. याच परिस्थितीमुळे शिंदे कुटुंबावरही ताण निर्माण झाल्याची प्राथमिक माहिती आहे.दरम्यान,रविवारी सायंकाळच्या सुमारास गोलू शिंदे यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे समोर आले.त्यामुळे त्यांना तातडीने कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले व उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
उपचार सुरू असतानाच २२ नोव्हेंबरच्या रात्री त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे वाल्हई सह परिसरात शोककळा पसरली असून,शेतकरी कुटुंबांवरील वाढता आर्थिक ताण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ!निसर्गाची अनिश्चितता, पिकांचे घटते उत्पादन, वाढता शेती खर्च आणि कर्जाचा आर्थिक भार यामुळे ग्रामीण भागातील अनेक शेतकरी कुटुंबांसमोर गंभीर अडचणी निर्माण होत आहेत.वाल्हई येथील या घटनेनंतर शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक तसेच मानसिक अडचणींकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.


