Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • Sanjay Raut: शरद पवारांचा NDA प्रवेशाला विरोध? राष्ट्रवादीत दोन गट पडण्याची शक्यता; संजय राऊतांचा मोठा दावा
- महाराष्ट्र - मुंबई - राजकारण

Sanjay Raut: शरद पवारांचा NDA प्रवेशाला विरोध? राष्ट्रवादीत दोन गट पडण्याची शक्यता; संजय राऊतांचा मोठा दावा

संजय राऊत यांनी शरद पवारांच्या राजकीय भूमिकेवर विश्वास व्यक्त करत महायुती सरकारवर निशाणा साधला. 20 आदिवासी कुटुंबांच्या जमीनप्रश्नी राहुल नार्वेकरांना सवाल करत कुलाब्यातील 50 लाखांच्या कथित व्यवहाराची चौकशी करण्याची मागणीही केली.

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेपासून ते आदिवासींच्या जमीनप्रश्नापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य करत महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. शरद पवार एनडीएसोबत जाण्याची भूमिका घेतील, असे आपल्याला वाटत नसल्याचे सांगतानाच त्यांनी त्यांच्या राजकीय वारसदारांनाही पुरोगामी विचारांची जाणीव ठेवण्याचा सल्ला दिला.

राऊत म्हणाले की, शरद पवार यांनी संपूर्ण राजकीय कारकीर्द धर्मांध शक्तींविरोधात लढण्यात घालवली. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे त्यांच्या राजकीय वारसदारांनी या विचारांशी प्रामाणिक राहणे आवश्यक आहे. सत्तेत जाण्याच्या घाईत हा विचार बाजूला ठेवणे योग्य नाही. प्रत्येक पक्षात दोन मतप्रवाह असू शकतात, असेही त्यांनी नमूद केले. अडचणीच्या काळात नरेंद्र मोदींना शरद पवारांनी मदत केली, तर बाळासाहेब ठाकरेंनीही मोदींच्या पंतप्रधानपदासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. असे असताना त्यांचे पक्ष फोडण्यात आले, अशी टीका त्यांनी केली.

20 आदिवासी कुटुंबांच्या घरांवरून नार्वेकरांना सवाल

मुंबईतील 20 आदिवासी कुटुंबांच्या घरांवर जेसीबी चालवण्यात आल्याचा आरोप करत राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. संबंधित कुटुंबांकडे कुळ कायद्यानुसार जमिनीची कागदपत्रे आहेत. सरकारी योजनेंतर्गत त्यांना घरेही बांधून देण्यात आली होती. मात्र, ही घरे पाडल्यानंतर पर्यायी जागा देण्यात आलेली नाही, असा दावा त्यांनी केला.

आदिवासींच्या जमिनी दुसऱ्यांच्या माध्यमातून हस्तांतरित करून पुढे व्यवहार केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी यामागे जमीन व्यवहारांचे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला. राहुल नार्वेकर यांच्याशी आपले संबंध चांगले असले तरी त्यांनी 20 आदिवासींचा आक्रोश ऐकावा, असे राऊत म्हणाले. सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन या प्रश्नासाठी संघर्ष करत असून, सरकारने आदिवासी कुटुंबांच्या बाजूने उभे राहावे, अशी मागणीही त्यांनी केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या प्रकरणात संबंधितांची बाजू न घेता पीडितांना न्याय द्यावा, असे ते म्हणाले. तसेच अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाल्यास त्यावर चर्चा होऊ दिली जाणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

अंगठे घेऊन जमिनीचे व्यवहार केल्याचा आरोप

आदिवासी कुटुंबे अशिक्षित असून त्यांना कागदपत्रे वाचता येत नसताना त्यांच्या अंगठ्यांचे ठसे घेण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला. या प्रकरणातील आणखी काही बाबी उघड करायच्या असल्याचे सांगत त्यांनी नार्वेकरांना इशाराही दिला. न्यायालयात जाण्याच्या धमक्या देऊ नयेत, असे म्हणत आपण अनेक वर्षे न्यायालयीन आणि पोलीस प्रक्रियेतून गेल्याचे त्यांनी नमूद केले.

कुलाब्यातील 50 लाखांच्या व्यवहारामागे कोण?

कुलाब्यात निवडणुकीतून माघार घेण्यासाठी एका व्यक्तीला 50 लाख रुपये दिल्याच्या कथित प्रकरणावरूनही संजय राऊत यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. शिंदे गटातील कार्यकर्त्यांना पैशांच्या जोरावर विकत घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधितांना पाच ते 50 लाख रुपये देण्यात आले असतील, तर हा पैसा नेमका कोणी दिला आणि त्यामागे कोणता मोठा नेता आहे, हे समोर आले पाहिजे, असे ते म्हणाले.

ईडीने 50 लाख रुपयांच्या अधिकृत व्यवहाराच्या प्रकरणात आपल्याला कोठडीत टाकले होते, असा उल्लेख करत त्यांनी या कथित व्यवहाराचीही निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. पैसे देणाऱ्याचे नाव, या व्यवहारातील लाभार्थी आणि प्रचारात सहभागी असलेल्या संबंधित कुटुंबाची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे, असे आव्हान त्यांनी दिले.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/