Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • Karanja Cotton Marke: कारंजा बाजार समितीत कापसाला हंगामाच्या पहिल्याच दिवशी 9,400 रुपयांचा विक्रमी भाव; 790 क्विंटल आवक
- महाराष्ट्र - शेती

Karanja Cotton Marke: कारंजा बाजार समितीत कापसाला हंगामाच्या पहिल्याच दिवशी 9,400 रुपयांचा विक्रमी भाव; 790 क्विंटल आवक

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस खरेदी हंगामाच्या पहिल्याच दिवशी कापसाला 9,400 रुपये प्रतिक्विंटल कमाल भाव मिळाला. पहिल्याच दिवशी 790 क्विंटल कापसाची आवक झाली असून सरासरी दर 9,320 रुपये राहिला. या चांगल्या दरामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वाशिम: कापूस खरेदी हंगामाच्या पहिल्याच दिवशी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला प्रतिक्विंटल 9 हजार 400 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. त्यामुळे यंदाच्या कापूस हंगामाची सुरुवात दमदार झाली असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पहिल्याच दिवशी बाजार समितीत तब्बल 790 क्विंटल कापसाची आवक झाली.

कारंजा येथील स्व. प्रकाशदादा उत्तमराव डहाके मार्केट यार्डात सोमवार, 23 नोव्हेंबर रोजी कापूस खरेदी हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार तथा बाजार समितीच्या सभापती सईताई प्रकाशदादा डहाके यांच्या हस्ते कापूस खरेदीचा प्रारंभ झाला.

बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी कापसाला किमान 9 हजार 160 रुपये, सरासरी 9 हजार 320 रुपये, तर कमाल 9 हजार 400 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. सुरुवातीलाच मिळालेल्या या चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी बाजार समितीचे उपसभापती प्रकाश लिंगाटे, संचालक मंडळ, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष देवेंद्र पाटील ताथोड, उपाध्यक्ष व संचालक मंडळ, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विश्वनाथ पाटील ताथोड, बाजार समितीचे सचिव निलेश भाकरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

यंदाच्या हंगामात कापसाला चांगला बाजारभाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य आणि स्पर्धात्मक दर मिळावा, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे. पहिल्याच दिवशी मिळालेल्या 9,400 रुपयांच्या कमाल दरामुळे कारंजा बाजार समितीत कापूस खरेदी हंगामाची उत्साहात सुरुवात झाली आहे.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/