अमरावती: शहरात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात अमरावती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे गोपालनगर परिसरात छापा टाकत दोन आरोपींना रंगेहात पकडले. या कारवाईत ट्रॅक्टर-ट्रॉली, एक्स्कॅव्हेटर मशीन आणि रेती असा एकूण 25 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपालनगर परिसरातील स्कूल ऑफ स्कॉलर्ससमोर अवैधरीत्या रेतीची वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये रेती भरली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने महसूल विभागाकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे घटनास्थळी छापा टाकला. यावेळी लाल रंगाच्या महिंद्रा 575 डीआय ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये एक्स्कॅव्हेटर मशीनच्या साहाय्याने रेती भरली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सय्यद इमरान सय्यद अकील (वय 30) आणि समशाद अली सल्लाउद्दीन अन्सारी (वय 22) या दोघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी या कारवाईत 5 लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर-ट्रॉली, 20 लाख रुपये किमतीची एक्स्कॅव्हेटर मशीन आणि 40 हजार रुपये किमतीची रेती असा एकूण 25 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.




