छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीस्थळी जयघोष करण्यास पोलिसांनी मनाई केल्याची घटना समोर आल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकारावर आमदार बच्चू कडू यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, संबंधित पोलिसांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. आमदार धीरज लिंगाडे यांनीही या प्रकरणात कारवाईची मागणी केली आहे.
रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी शिवरायांचा जयघोष करण्यास पोलिसांनी विरोध केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत असून, राजकीय स्तरावरूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आमदार बच्चू कडू यांनी या घटनेवर बोलताना संबंधित पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “शिवरायांच्या जयघोषाला विरोध करणाऱ्या पोलिसांचा डीएनए तपासला पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. तसेच, संबंधित पोलिसांना तातडीने सेवेतून बाहेर काढण्याची मागणीही त्यांनी केली. हा विषय केवळ जयघोष करण्यापुरता मर्यादित नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांना विरोध करण्यामागचे नेमके कारण काय, हे समोर आले पाहिजे, असेही ते म्हणाले.
महापुरुष हे कोणत्याही जाती-धर्माच्या चौकटीत अडकलेले नसतात. ते संपूर्ण राष्ट्रासाठी आणि देशासाठी प्रेरणास्थान असतात. त्यामुळे त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा सन्मान प्रत्येकाने केला पाहिजे, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी इशाराही दिला. संबंधित पोलिसांना कारवाईचा धाक दाखवला पाहिजे, अन्यथा आमचे शिवसैनिक त्यांना चटके देतील, असे विधान त्यांनी केले.




