वृद्ध आजीचा उपनिबंधक कार्यालयात टाहो लक्ष्मी पतसंस्थेच्या ठेवीदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर पायदळ मार्च; कष्टाचे पैसे परत मिळण्याची मागणी

“मी मेल्यावरच माझ्या तेरवीला माझे पैसे मिळतील काय? माझे कुणीच नाही, किती वेळा कार्यालयाच्या चकरा मारू? हात जोडून विनंती करते, माझ्या घामाचे २४ हजार रुपये तरी द्या हो!” अशा आर्त शब्दांत ७० वर्षीय शांताबाई गोमा मांढरे यांनी शुक्रवारी भंडारा येथील उपनिबंधक कार्यालयात आपल्या व्यथा मांडल्या.
लाखनी तालुक्यातील पोहरा येथील रहिवासी असलेल्या शांताबाईंच्या या आक्रोशाने उपस्थितांचे मन हेलावून गेले.लाखनी येथील लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत ठेवी ठेवलेल्या गोरगरीब खातेदारांचे पैसे दीर्घकाळापासून अडकले असून, ते परत मिळावेत यासाठी शुक्रवारी अस्मितेचा एल्गार संघटनेचे अध्यक्ष परमानंद मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली खातेदारांनी भंडारा येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायदळ मार्च काढला.

लक्ष्मी पतसंस्थेत साकोली, पोहरा, सानगडी, जांभळी (सडक), लवारी, उमरी यासह अनेक गावांतील हजारो नागरिकांनी मेहनतीने जमविलेल्या पैशांच्या ठेवी अडकल्या आहेत. या ठेवी परत मिळाव्यात यासाठी खातेदारांकडून सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. यापूर्वीही अस्मितेचा एल्गार संघटनेच्या माध्यमातून उपनिबंधक व जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन निवेदने देण्यात आली, चर्चा करण्यात आली; मात्र खातेदारांच्या समस्येवर अद्याप ठोस तोडगा निघालेला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
शुक्रवारी सुमारे ७० ते ८० खातेदारांनी पायदळ मार्च काढत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. उपनिबंधक कार्यालयात आपल्या अडकलेल्या ठेवींची व्यथा मांडताना अनेक खातेदार भावूक झाले. वृद्ध, गरीब आणि गरजू नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईचे पैसे अडकले असताना प्रशासनाकडून अपेक्षित गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
“आमच्या कष्टाचे पैसे आम्हाला परत मिळवा,” अशी आर्त मागणी करत खातेदारांनी जिल्हा प्रशासनाकडे न्याय मिळवून देण्याची विनंती केली. अडकलेल्या ठेवी परत मिळण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.




