राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेणार का? गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात या प्रश्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियांमुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली असतानाच, शरद पवार यांच्या एका कृतीने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
बारामती येथील त्यांच्या गोविंद बाग निवासस्थानी असलेल्या ऊसशेतीची शरद पवार यांनी पाहणी केली. यावेळी युगेंद्र पवारही त्यांच्यासोबत उपस्थित होते. विशेष म्हणजे, या शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या आधुनिक प्रयोगामुळे ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून या शेतात प्रति एकर साधारण 60 टन ऊस उत्पादन मिळत होते. मात्र, AI तंत्रज्ञानाच्या मदतीने हे उत्पादन दुप्पट म्हणजेच प्रति एकर तब्बल 120 टनांपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवार यांनी या प्रयोगाची माहिती घेत शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत जाणून घेतले.
दरम्यान, शरद पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पवार यांच्या राज्यसभेच्या कार्यकाळाला अद्याप पाच वर्षे शिल्लक असल्याचे सांगत त्यांनी निवृत्तीच्या चर्चांवर प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘पवार कधीही थांबणार नाहीत’, अशी प्रतिक्रिया दिली. खासदार संजय राऊत यांनी या चर्चांमागे राजकीय संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, शरद पवार स्वतःहून सरकारबरोबर जातील असे वाटत नाही; मात्र डिलिमिटेशनसारख्या राष्ट्रीय विषयावर ते केंद्राला मदत करू शकतात.




