Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • Pune Court Attack Update: पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर मंदार किवळेवर हल्ला; प्रकृती चिंताजनक: पुढील 72 तास महत्त्वाचे, ससूनच्या डीननी दिली आरोग्याची माहिती
- क्राईम - पुणे - महाराष्ट्र

Pune Court Attack Update: पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर मंदार किवळेवर हल्ला; प्रकृती चिंताजनक: पुढील 72 तास महत्त्वाचे, ससूनच्या डीननी दिली आरोग्याची माहिती

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर मंदार किवळे याच्यावर गोळीबाराचा प्रयत्न करत कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी पुढील 72 तास महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसरात मंगळवारी (25 नोव्हेंबर) दुपारी घडलेल्या हल्ल्याने शहरात खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 बाहेर मंदार किवळे या तरुणावर सहा जणांनी हल्ला केला. सुरुवातीला पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, गोळी मिसफायर झाल्यानंतर हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून मंदारला गंभीर जखमी केले. भरदिवसा न्यायालयाबाहेर घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

मंदारची प्रकृती चिंताजनक; 72 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली

हल्ल्यानंतर जखमी मंदारला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाचे डीन डॉ. येल्लाप्पा जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदारला मोठ्या प्रमाणात दुखापती झाल्या असून रक्तस्त्रावही अधिक झाला आहे. गोळी त्याच्या उजव्या हाताला आणि पाठीला चाटून गेली आहे. तर कोयत्याच्या वारांमुळे दोन्ही हातांना गंभीर जखमा झाल्या आहेत. हल्ल्यापासून बचाव करताना त्याने हातांनी डोके झाकल्याने हातांवर अनेक वार झाले. याशिवाय डोक्याच्या मागील बाजूस फ्रॅक्चर झाले आहे. पुढील 72 तास त्याच्यासाठी महत्त्वाचे असून डॉक्टरांकडून त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.

जामीन मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हल्ल्याचे लक्ष्य

मंदार किवळे याचे नाव 2025 मधील शुभम चव्हाण हत्या प्रकरणात आरोपी म्हणून समोर आले होते. या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी त्याला जामीन मिळाला होता. मंगळवारी सुनावणीसाठी तो न्यायालयात आला होता. दुपारी सव्वा एकच्या सुमारास न्यायालयाबाहेर पडताच दुचाकींवरून आलेल्या सहा जणांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

जुन्या वादातून हल्ल्याचा संशय; पोलिसांची शोधमोहीम

प्राथमिक माहितीनुसार, शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शुभमच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अक्षय चव्हाण याने कट रचल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, याबाबत अधिकृत तपासातूनच सत्य समोर येणार आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पिस्तुले जप्त केली आहेत. हल्लेखोरांची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, फरार आरोपींच्या अटकेसाठी 8 ते 10 विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच अशा प्रकारचा हल्ला घडल्याने न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या ठिकाणी शस्त्रांसह आलेल्या हल्लेखोरांनी हल्ला करून पळ काढल्याने पोलिसांसमोर आरोपींना लवकरात लवकर पकडण्याचे आव्हान आहे.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/