Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • Sunetra Pawar: पुण्यातील कोर्टाबाहेरील गोळीबावर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, :‘आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी तडजोड नाही’
- क्राईम - पुणे - महाराष्ट्र

Sunetra Pawar: पुण्यातील कोर्टाबाहेरील गोळीबावर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, :‘आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी तडजोड नाही’

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर झालेल्या गोळीबार आणि कोयत्याने हल्ल्याची सुनेत्रा पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देत त्यांनी पुणेकरांच्या सुरक्षिततेबाबत ठाम भूमिका मांडली.

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबार आणि कोयत्याने हल्ल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 जवळ सहा जणांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेची उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी गंभीर दखल घेतली असून, दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे.

न्यायालय परिसरात सहा जणांचा थरार

मिळालेल्या माहितीनुसार, मंदार किवळे हा तरुण न्यायालयातील सुनावणी संपवून बाहेर पडत असताना दोन दुचाकींवरून आलेल्या सहा हल्लेखोरांनी त्याला लक्ष्य केले. हल्लेखोरांनी सुरुवातीला पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोयत्याने त्याच्यावर वार केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे न्यायालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या हल्ल्यात मंदार गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

जुन्या वैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय

पोलिसांच्या प्राथमिक तपासात या घटनेमागे जुन्या वादाची पार्श्वभूमी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जखमी मंदार किवळे हा 2025 मधील शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात जामिनावर बाहेर आल्यानंतर तो सुनावणीसाठी न्यायालयात आला होता. याच जुन्या वादातून सूडभावनेने हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची विशेष पथके

फरार हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी 8 ते 10 विशेष पथके तैनात केली आहेत. आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आल्याची माहितीही समोर आली आहे. दुचाकी आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.

सुनेत्रा पवार यांचा पोलिसांना कडक इशारा

या घटनेवर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार यांनी पुणेकरांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवावे आणि न्यायालयांसह गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी, अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/