Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • Pune Crime News: पुण्यात कोर्टाबाहेरच रक्तरंजित थरार! जामिनावर सुटलेल्या आरोपीवर गोळीबार अन् कोयत्याने हल्ला; सुप्रिया सुळे, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल
- क्राईम - पुणे - महाराष्ट्र

Pune Crime News: पुण्यात कोर्टाबाहेरच रक्तरंजित थरार! जामिनावर सुटलेल्या आरोपीवर गोळीबार अन् कोयत्याने हल्ला; सुप्रिया सुळे, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाबाहेर जामिनावर सुटलेल्या मंदार किवळे याच्यावर गोळीबार आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून सुप्रिया सुळे आणि विजय वडेट्टीवार यांनी गृहखात्यावर टीका केली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.

पुण्यातील गुन्हेगारी घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 बाहेर बुधवारी (25 नोव्हेंबर) दुपारी एका तरुणावर गोळीबार आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. न्यायालयासारख्या संवेदनशील परिसरातच हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंदार मारुती किवळे असे हल्ल्यातील तरुणाचे नाव आहे. तो कात्रज येथील संतोषनगरमध्ये 20 एप्रिल 2025 रोजी झालेल्या शुभम सुभाष चव्हाण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आलेला मंदार बुधवारी न्यायालयीन कामकाजासाठी शिवाजीनगर कोर्टात आला होता.

दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांचा अचानक हल्ला

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दुचाकींवरून आलेल्या सहा ते सात हल्लेखोरांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर मंदारला लक्ष्य केले. सुरुवातीला त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर हल्लेखोरांनी कोयत्याने त्याच्यावर वार केले. हल्ल्यात त्याच्या डोक्याला आणि हातांना गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर जखमी तरुणाला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त असून मृत्यूबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. हल्लेखोर घटनास्थळावरून दुचाकींनी पसार झाले.

घटनास्थळावर दोन पिस्तुले जप्त

पोलिसांनी घटनास्थळाचा परिसर सील केला असून दोन पिस्तुले आणि जिवंत काडतुसांनी भरलेले मॅगझिन जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची पथके तपास करत आहेत. काही संशयितांची नावेही तपासादरम्यान समोर आल्याचे वृत्त आहे.

सुप्रिया सुळे आणि विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका

या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. न्यायालयाच्या परिसरात पोलीस चौकी आणि बंदोबस्त असतानाही अशा प्रकारचा हल्ला होणे गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत पोलिसांच्या कार्यपद्धतीची चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच पुणे न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याची घटना समोर आली होती. त्यातच न्यायालयाबाहेर झालेल्या या हल्ल्यामुळे पुण्यातील सुरक्षा व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/