वाशीम: रिसोड पंचायत समितीतील सहायक लेखा अधिकारी जितेंद्र रा. मनोहर यांच्यावर वाशीम जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. कर्तव्यात कसूर करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन न करणे आणि कार्यालयात अनधिकृतपणे गैरहजर राहणे, या आरोपांवरून ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी ६ नोव्हेंबर २०२६ रोजी निलंबनाचे आदेश जारी केले.
महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ तसेच महाराष्ट्र जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम ३ च्या तरतुदींच्या उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
तीन प्रमुख आरोपांवरून निलंबन
सहायक लेखा अधिकारी जितेंद्र मनोहर यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन न करणे, सोपविलेल्या कर्तव्यांमध्ये कसूर करणे आणि कार्यालयात कोणतीही अधिकृत परवानगी न घेता गैरहजर राहणे, असे तीन प्रमुख आरोप ठेवण्यात आले आहेत.
निलंबन काळात वाशीम राहणार मुख्यालय
निलंबनाच्या कालावधीत जितेंद्र मनोहर यांचे मुख्यालय पंचायत समिती, वाशीम येथे निश्चित करण्यात आले आहे. या कालावधीत त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता मिळणार आहे. मात्र, ते कोणतीही खासगी नोकरी किंवा व्यवसाय करीत नसल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच निर्वाह भत्ता अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कनिष्ठ लेखा अधिकाऱ्याकडे अतिरिक्त कार्यभार
दरम्यान, रिसोड पंचायत समितीतील सहायक लेखा अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार तेथील कनिष्ठ लेखा अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे. तसेच निलंबित अधिकारी जितेंद्र मनोहर यांच्याविरोधात विभागीय खातेचौकशी सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.




