Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • Pune Crime: पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर गँगवॉरचा थरार! खुनाचा बदला घेण्यासाठी हल्ला? सहा जण पोलिसांच्या ताब्यात
- क्राईम - पुणे - महाराष्ट्र

Pune Crime: पुणे शिवाजीनगर कोर्टाबाहेर गँगवॉरचा थरार! खुनाचा बदला घेण्यासाठी हल्ला? सहा जण पोलिसांच्या ताब्यात

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर मंदार किवळे याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. जुन्या खुनाच्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पुणे: शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी मंदार मारुती किवळे याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, जुन्या खुनाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

बुधवारी (25 नोव्हेंबर) दुपारी सव्वा एकच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयाबाहेर ही घटना घडली. न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या मंदार किवळे याच्यावर चार ते पाच जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात किवळे गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता दोन बंदुकाही जप्त करण्यात आल्या.

या प्रकरणात अक्षय सुभाष चव्हाण (वय 20), अमोल रामचंद्र चव्हाण (वय 48), स्वप्निल बाजीराव गवळी (वय 28), ओंकार संतोष पवार (वय 18), सूरज साधू मलेकर (वय 22) आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. दौंड आणि आंबेगाव पठार परिसरातून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

नेमकं जुनं वैमनस्य काय?

मंदार किवळे याच्यावर 20 एप्रिल 2025 रोजी कात्रजमधील संतोषनगर येथे झालेल्या शुभम सुभाष चव्हाण यांच्या खूनप्रकरणी गुन्हा दाखल आहे. जमिनीच्या आणि आर्थिक वादातून हा खून झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणात कारागृहात असलेला किवळे 18 नोव्हेंबर रोजी जामिनावर बाहेर आला होता. दरम्यान, अक्षय चव्हाण याच्या भावाचाही दोन वर्षांपूर्वी खून झाला होता. त्या प्रकरणात मंदार किवळे आरोपी असल्याने दोन्ही गटांमध्ये जुने वैमनस्य असल्याचा संशय आहे. याचाच बदला घेण्यासाठी न्यायालयाबाहेर हल्ला करण्यात आल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.

गोळी लागल्याचे पुरावे नाहीत; दोन बंदुका जप्त

पुणे पोलिसांचे उपआयुक्त गौहर हसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात मंदार किवळे गंभीर जखमी झाला आहे. डॉक्टरांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्याच्या शरीरावर गोळी लागल्याच्या जखमा आढळलेल्या नाहीत. मात्र, घटनास्थळावरून दोन बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. या हल्ल्यामागील नेमके कारण, हल्ल्याचे नियोजन आणि इतर संशयितांचा सहभाग याबाबत पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/