Loading date...
Trending Now

Some Populer Post

  • Home  
  • पुणे कोर्टातील गोळीबारावरून हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, ‘महाराष्ट्राला तालिबान करण्याचं स्वप्न पूर्ण झालं का?’
- महाराष्ट्र - राजकारण

पुणे कोर्टातील गोळीबारावरून हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, ‘महाराष्ट्राला तालिबान करण्याचं स्वप्न पूर्ण झालं का?’

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले.

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणाबाहेरच सशस्त्र हल्ला झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 बाहेर एका तरुणावर सहा जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याची घटना घडली. हल्लेखोरांनी आधी गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने वार केल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, टोळीयुद्धातून हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भरदिवसा न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेवर बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘न्यायदेवतेच्या दारात अराजकतेचा कहर झाला आहे. महाराष्ट्राला तालिबान करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे का?’ असा सवाल त्यांनी केला. तसेच महाराष्ट्राचा कारभार घाशीराम कोतवाल चालवत आहेत का, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, सपकाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुरू असलेल्या संविधान वाचन दौऱ्यावरही निशाणा साधला. ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ अशा शब्दांत त्यांनी शिंदे गटावर टीका केली. ‘50 खोके, सगळं ओके’चा नारा देणारे आता संविधानाच्या गोष्टी करत असल्याचे म्हणत त्यांनी या दौऱ्याच्या राजकीय हेतूवर प्रश्न उपस्थित केला.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावरूनही त्यांनी भाजपवर आरोप केले. महाराष्ट्रात पक्ष फोडण्याचे राजकारण सुरू असून पक्ष पळवणारी गँग सक्रिय झाल्याची टीका त्यांनी केली. यावेळी मूळ शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याकडे असल्याचेही त्यांनी म्हटले.

याशिवाय डिलिमिटेशन विधेयकावर बोलताना सपकाळ यांनी या विधेयकाला काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा विरोध असल्याचे स्पष्ट केले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

About Us

Today Maharashtra चे उद्दिष्ट या स्थानिक कथा आणि महाराष्ट्व्यापी डिजिटल प्रेक्षक यांच्यातील दुरी कमी करणे आहे.

Email Us:

Contact:

Today Maharashtra © 2026 All Rights Reserved. | Developed by https://startmarketing.in/