छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यात थंडीचा जोर वाढत असतानाच ग्रामीण भागात पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. अनेक गावांमधील जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. सध्या जिल्ह्यातील 118 गावे आणि 33 वाड्यांमधील तब्बल 2 लाख 85 हजार 889 नागरिकांना 179 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.
पैठण, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर आणि फुलंब्री या पाच तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता अधिक जाणवत आहे. यामध्ये पैठण तालुक्याची परिस्थिती सर्वाधिक चिंताजनक आहे. तालुक्यातील 34 गावे आणि 19 वाड्यांमधील सुमारे 89 हजार 662 नागरिकांना 60 टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. तर गंगापूर तालुक्यातील 40 गावांमध्ये 59 टँकर सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात 21, वैजापूरमध्ये 26, तर फुलंब्री तालुक्यात 13 टँकरच्या माध्यमातून नागरिकांची पाण्याची गरज भागवली जात आहे. विशेष म्हणजे, पाणीपुरवठ्यासाठी टँकरना दररोज सुमारे 6 हजार किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. मंजूर 336 खेपांपैकी प्रत्यक्षात 330 खेपा होत आहेत.
उन्हाळ्यापूर्वी उपाययोजनांचे आव्हान
हिवाळ्यातच पाण्याची अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी उन्हाळ्यात टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एप्रिल आणि मे महिन्यांत टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे प्रशासनासमोर पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
केवळ टँकरवर अवलंबून न राहता बंद पडलेल्या नळयोजना सुरू करणे, विहिरींचे अधिग्रहण करणे, तसेच नदी आणि तलावांचे खोलीकरण करून पाणी साठवण क्षमता वाढवणे आवश्यक आहे. वेळीच जलसंधारणाची कामे आणि ठोस उपाययोजना झाल्या नाहीत, तर उन्हाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी अधिक संघर्ष करावा लागू शकतो.
