बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात घरात घुसून चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लखानी चौक परिसरात एका महिलेने घरात प्रवेश करून सासूच्या हातातील सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतल्याचा प्रकार घडला. या वेळी सासू आणि सुनेसोबत झटापट करून संशयित महिला घटनास्थळावरून पसार झाली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली अजय तिवारी आणि त्यांच्या सासू उर्मिला सुरेश तिवारी या घरी असताना तोंडाला स्कार्फ बांधलेली एक महिला अचानक घरात आली. तिने पलंगावर बसलेल्या उर्मिला यांच्याशी झटापट सुरू केली. याच दरम्यान त्यांच्या हातातील पाच ग्रॅम वजनाची, अंदाजे 35 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने हिसकावून घेतली. या झटापटीत उर्मिला यांच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत होऊन रक्तस्राव झाला.
सासूचा आवाज ऐकून सोनाली तिवारी मदतीसाठी धावल्या. मात्र, संशयित महिलेने त्यांच्याशीही झटापट केली. नखांनी ओरखडे काढत छातीवर काठीने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. दरम्यान, सासू आणि सुनेने धाडस दाखवत महिलेचा स्कार्फ काढला. त्यावेळी ती घरामागील गल्लीत राहणारी कोमल असल्याचे ओळख पटल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मात्र, तिने दोघींच्या तावडीतून सुटका करून घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेनंतर सोनाली तिवारी यांनी शेजारील मीनाक्षी वर्मा यांच्यासह पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 115(2), 118(1), 309(4) आणि 331(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मोहन झेडगे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे लखानी चौक परिसरात नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.




