रोजगाराच्या शोधात गुजरातमधील सुरत येथे निघालेल्या जळगावच्या पाटील कुटुंबावर झालेल्या भीषण हल्ल्याने महाराष्ट्रासह गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे. बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ चौघांनी कुटुंबातील सदस्यांना जबरदस्तीने वाहनातून बाहेर काढून कालव्यात फेकल्याची घटना घडली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून, दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. आता या प्रकरणामागे विमा घोटाळ्याशी संबंधित कारण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल परिसरातील नितीन उर्फ भुरिया पाटील हे 21 नोव्हेंबर रोजी कुटुंबासह कामाच्या शोधात सुरतकडे रवाना झाले होते. मात्र, उवा गावाजवळ एका कारमधून आलेल्या चौघांनी त्यांचे वाहन अडवले. त्यानंतर कुटुंबीयांना बाहेर काढून जवळच्या कालव्यात फेकण्यात आले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेत 13 वर्षीय मुलाने प्रसंगावधान राखत कालव्यातील पाइप पकडला आणि स्वतःचा जीव वाचवला. पाण्यातून बाहेर आल्यानंतर त्याने जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन नागरिकांकडे मदत मागितली. त्याच्या माहितीवरून पोलिसांना घटनेची माहिती मिळाली आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली.
बचाव पथकाला नितीन पाटील, त्यांची पत्नी कविता पाटील आणि कुटुंबातील एका तरुणीचे मृतदेह आढळले. तर प्रथमेश पाटील आणि हरीश संजय पाटील या दोन मुलांचा शोध अद्याप सुरू आहे.
विमा घोटाळ्याशी काय संबंध?
दरम्यान, तपासात पाटील कुटुंब विमा घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात साक्षीदार असल्याची माहिती समोर आली आहे. साक्षीदारांना संपवण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला का, या शक्यतेने तपासाला नवे वळण मिळाले आहे. महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांनी सुरत पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांकडून त्यांना या तपासाबाबत माहिती देण्यात आली.
या प्रकरणी चार संशयितांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी आठ पथके तयार केली आहेत. विमा घोटाळा आणि या हत्याकांडाचा नेमका संबंध काय, तसेच दोन बेपत्ता मुलांचे काय झाले, याचा उलगडा आता पोलिस तपासातून होणार आहे.
