पुण्यातील गुन्हेगारी घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 बाहेर बुधवारी (25 नोव्हेंबर) दुपारी एका तरुणावर गोळीबार आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. न्यायालयासारख्या संवेदनशील परिसरातच हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंदार मारुती किवळे असे हल्ल्यातील तरुणाचे नाव आहे. तो कात्रज येथील संतोषनगरमध्ये 20 एप्रिल 2025 रोजी झालेल्या शुभम सुभाष चव्हाण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आलेला मंदार बुधवारी न्यायालयीन कामकाजासाठी शिवाजीनगर कोर्टात आला होता.
दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांचा अचानक हल्ला
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दुचाकींवरून आलेल्या सहा ते सात हल्लेखोरांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर मंदारला लक्ष्य केले. सुरुवातीला त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर हल्लेखोरांनी कोयत्याने त्याच्यावर वार केले. हल्ल्यात त्याच्या डोक्याला आणि हातांना गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर जखमी तरुणाला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त असून मृत्यूबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. हल्लेखोर घटनास्थळावरून दुचाकींनी पसार झाले.
घटनास्थळावर दोन पिस्तुले जप्त
पोलिसांनी घटनास्थळाचा परिसर सील केला असून दोन पिस्तुले आणि जिवंत काडतुसांनी भरलेले मॅगझिन जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची पथके तपास करत आहेत. काही संशयितांची नावेही तपासादरम्यान समोर आल्याचे वृत्त आहे.
सुप्रिया सुळे आणि विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका
या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. न्यायालयाच्या परिसरात पोलीस चौकी आणि बंदोबस्त असतानाही अशा प्रकारचा हल्ला होणे गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत पोलिसांच्या कार्यपद्धतीची चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच पुणे न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याची घटना समोर आली होती. त्यातच न्यायालयाबाहेर झालेल्या या हल्ल्यामुळे पुण्यातील सुरक्षा व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
